भैरी-नवलाई-पावणाई भेटीचा रंगला अनुपम सोहळा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 मार्च 2017

रत्नागिरी - होळी पौर्णिमेला रात्री बारा वाजता ग्रामदैवत कालभैरव तथा भैरी ग्रामप्रदक्षिणेसाठी बाहेर पडतोय... ढोल-ताशांचा गजर आणि भाविकांच्या तुडुंब गर्दीने आवार फुलून गेलेले... अशा भक्तिमय वातावरणात भैरीबुवा आणि त्याच्या मिऱ्या येथील दोन भगिनी नवलाई-पावणाईदेवीच्या पालख्यांची भेट झाली... या भेटीने शिमगोत्सवाने आगळी उंची गाठली आणि हजारो भाविक आनंदून गेले. पालख्या भेटीचा हा सोहळा आपल्या डोळ्यांत साठवून ठेवत भैरीच्या चरणी हजार भाविक नतमस्तक झाले. काल (ता. १२) भैरी-नवलाईच्या भेटीचा हा सोहळा रंगला.

रत्नागिरीतील शिमगोत्सवात खरा मान भैरीबुवाचा असतो. भैरीबुवाची अधिसत्ता काजरघाटीपर्यंतच्या बारा वाड्यांत आहे. त्यामुळे भैरीबुवाला भेटण्यासाठी आसपासच्या गावांतील ग्रामदेवता येतात. यामध्ये काजरघाटी येथील महालक्ष्मी, टेंभ्ये येथील भैरी-जुगाई यांचा समावेश आहे. पौर्णिमेला भैरीबुवा जोगेश्‍वरीची होळी तोडण्यासाठी बाहेर पडतात. सडामिऱ्या येथील नवलादेवी-पावणादेवी व जाेपमिऱ्या येथील नवलाई, पावणाई या दोन्ही देवी भैरीबुवाच्या बहिणी. त्यामुळे या दोन पालख्या होळी तोडण्यासाठी जाताना भावाच्या भेटीला येतात. ढोल-ताशांच्या गजरात वाजतगाजत या पालख्या भैरीच्या देवळात येतात. या शिमगोत्सवासाठी चाकरमानी अत्यंत भक्तिभावाने कोकणात दाखल होत असतात. त्याचा प्रत्यय कालच्या सोहळ्यातही आला.

काल रात्री बारा वाजता भैरीची मनोभावे प्रार्थना करून पालखी ग्रामप्रदक्षिणेला निघाली. तत्पूर्वी जाकिमिऱ्या आणि सडामिऱ्या येथील नवलाई-पावणाईदेवीच्या पालख्या भैरीच्या प्रांगणात हजर झाल्या. या दोन्ही पालख्या आळीपाळीने भैरीला भेटल्या. पालख्यांची विधिवत पूजा करण्यात आली. हा अनोखा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक आतुरतेने वाट पाहत होते. ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण व हुरा रे हुरा आणि आमच्या भैरीबुवाचा सोन्याचा तुरा ऽऽ रे होलिओऽऽ, आलकी रे आलकी भैरीबुवाची सोन्याची पालखी अशा फाकांनी आसमंत दुमदुमला आणि पालखी भेटीचा हा सोहळा हजारो भक्तांनी डोळ्यांत साठवून घेतला. ग्रामप्रदक्षिणेसाठी बाहेर पडलेल्या पालखीचे ठिकठिकाणी जंगी स्वागत होत होते. गाऱ्हाणे घालणे, उल्पा देणे असे कार्यक्रम पार पडल्यानंतर ही पालखी झाडगाव येथील सहाणेवर बसेल.

थेट ऑनलाइन प्रक्षेपण
या भैरी आणि मिऱ्या येथील पालखी भेटीचा हा सोहळा रत्नागिरीबाहेर असणाऱ्या सुमारे १० हजार भाविकांनीही ऑनलाइन अनुभवला. त्यासाठी ऑफबीट आर्टिस्ट, टीम जिनियस आणि गायत्री व्हिडिओ या सर्वांनी एकत्र येऊन रत्नागिरीबाहेर आणि देशाबाहेर असणाऱ्या भाविकांना पालखी भेटीचा अपूर्व सोहळा अनुभवता यावा, यासाठी थेट शूटिंग करून एका लिंकद्वारे इंटरनेटवर टाकण्यात येत होते. त्यामुळे घटनास्थळावरील जल्लोष, पालखी भेटीच्यावेळचा आनंद आणि झालेली गर्दी भाविकांना थेट ऑनलाइनवर त्याच वेळी पाहायला मिळाली. या लिंकवरून हा सोहळा सुमारे दहा हजार भाविकांनी पाहिला. सायंकाळी आठ ते पहाटे दोन वाजेपर्यंत हा सोहळा सुरू होता.

Web Title: bhairi-navlai sohala