मतदानाआधी सेनेच्या उंटाला ताब्यात घ्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 मार्च 2019

खेड - निवडणुकीच्या आधी सेनेच्या उंटाला (जिल्हाप्रमुख सचिन कदम) ताब्यात घेतले नाही, तर येत्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात या प्रकरणातील बरबटलेल्या त्या निवडक पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित केल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा घणाणात भास्कर जाधव यांनी केला.

खेड - निवडणुकीच्या आधी सेनेच्या उंटाला (जिल्हाप्रमुख सचिन कदम) ताब्यात घेतले नाही, तर येत्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात या प्रकरणातील बरबटलेल्या त्या निवडक पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित केल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा घणाणात भास्कर जाधव यांनी केला.

खेडमधील मेळाव्यात ते बोलत होते. जाधव म्हणाले, ज्यावेळी ही गंभीर घटना घडली त्यावेळी सगळ्यांत आधी या विषयावर मी भाष्य केले. दोन समाजामध्ये तेढ निर्माण करू नका, अशी तंबी मी जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिली, परंतु त्यांचा एकच हेका, आमच्या लोकांना मारले, मी सोडणार नाही. आज माझ्या मतदारसंघातील दीडशे ते दोनशे जण गायब आहेत.

तीस-चाळीस जण आतमध्ये आहेत. या सगळ्यांच्या यादीमधील ३८ नंबरचा सेनेचा जिल्हाप्रमुख सचिन कदम बाहेर का? त्याला गीतेंचा आशीर्वाद आहे की तुम्ही त्यांचे मिंधे आहात. येत्या काही कालावधीत या उंटाला ताब्यात घेतले नाही, तर पावसाळी अधिवेशनात या प्रकरणातील काही मुख्य अधिकाऱ्यांना आम्ही घरी पाठवू.

काही दिवसांपूर्वी लोटेत शिवसेनेच्या मेळाव्यात उठून काही महिला भगिनींनी गीतेंना विचारले, आमची माणसं गेली तीस-चाळीस वर्षे तुमच्याशी निष्ठेने वागली. त्या माणसांना तुम्ही केव्हा सोडवणार, तर गीते म्हणाले ही निवडणूक झाली, की दोन-तीन महिन्यांत मी त्यांना सोडवेन. माझ्यावर विश्‍वास ठेवा. आतापर्यंत सहा वेळा गीते लोकसभेत गेले. दोन वेळा मंत्री झाले. फक्त समाजाच्या नावावर निवडून आले. पण या मतदारसंघात काय कामे केली? या निवडणुकीत या बिनकामाच्या लोकप्रतिनिधींना घरी पाठवू असा निर्णय सर्वांनी घ्या, असे जाधव यांनी सांगितले.

सुनील तटकरे, बाबाजी जाधव, चित्रा चव्हाण, विक्रांत जाधव, अजय बिरवटकर, शौकत मुकादम, सतीश कदम उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhaskar Jadhav comment