Chiplun रेल्वे स्थानकावर जल्लोषात स्वागत ; भास्कर जाधवाना अश्रू अनावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chiplun : रेल्वे स्थानकावर जल्लोषात स्वागत ; भास्कर जाधवांना अश्रू अनावर

Chiplun : रेल्वे स्थानकावर जल्लोषात स्वागत ; भास्कर जाधवांना अश्रू अनावर

चिपळूण : शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांचे पोलिस संरक्षण काढून घेतल्यानंतर आज प्रथमच त्यांचे चिपळुणात आगमन झाले. कार्यकर्त्यांनी चिपळूण रेल्वे स्थानकावर त्यांचे जल्लोषात स्वागत केले. कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून भास्कर जाधव यांना अश्रू अनावर झाले.

केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात कुडाळ आणि मुंबईत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चामध्ये आमदार भास्कर जाधव यांनी भाजप, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्यावर कडक शब्दात टीका केली होती.

त्यानंतर राज्य सरकारने भास्कर जाधव यांना दिलेले संरक्षण काढून घेतले. नंतर त्यांच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा जाधव यांच्यातर्फे करण्यात आल्यामुळे कोकणातील राजकीय वातावरण तापलेले आहे.

दिवाळीच्या निमित्ताने आज ते रेल्वेमार्गाने चिपळूणला आले. ते येण्यापूर्वी शेकडो कार्यकर्ते चिपळूण रेल्वे स्थानकावर जमा झाले होते. आमदार जाधव ज्या रेल्वेने येणार होते ती रेल्वे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात जाणार होती. त्यामुळे चिपळूण स्थानकावर रेल्वे येताच आणि आमदार जाधव रेल्वेतून उतरण्यापूर्वीच कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. शिवसैनिकांच्या या कृतीने रेल्वेतील प्रवाशांचे लक्ष वेधून घेतले.

आमदार जाधव रेल्वेतून उतरल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. कोणी शिवसेनेता भगवा फेटा त्यांच्या गळ्यात घातला तर कुणी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. घोषणाबाजी सुरू असताना कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावर घेवून जल्लोष केला. तेव्हा भास्कर जाधव हात जोडून प्रत्येकाचे आभार मानत होते.

चिपळूणसह गुहागर आणि खेड तालुक्यातील शिवसेनेचे कार्यकर्ते त्यांच्या स्वागताला चिपळूण स्थानकावर जमले होते. कार्यकर्त्यांचा हा प्रेम पाहून त्यांना अश्रू अनावर झाले. डोळ्यातून अश्रू काढत ते कार्यकर्त्यांना भेटत होते. त्यामुळे कार्यकर्तेही भावूक झाले होते.