‘मोहिनी’ एकांकिकेतील भस्मासुराने वेधले लक्ष

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

कुडाळ - येथील निर्मिती थिएटर्सने एकाहून एक सरस राज्य पातळीवरील एकांकिका आणल्याने रसिकांसाठी ती पर्वणी ठरली. त्यातही कनेडीच्या १३ वर्षीय विठ्ठल गावकर यांच्या ‘भस्मासुर मोहिनी’ एकांकिकेत भस्मासूर या लक्षवेधी भूमिकेने रसिकांची मने जिंकली.

कुडाळ - येथील निर्मिती थिएटर्सने एकाहून एक सरस राज्य पातळीवरील एकांकिका आणल्याने रसिकांसाठी ती पर्वणी ठरली. त्यातही कनेडीच्या १३ वर्षीय विठ्ठल गावकर यांच्या ‘भस्मासुर मोहिनी’ एकांकिकेत भस्मासूर या लक्षवेधी भूमिकेने रसिकांची मने जिंकली.

नाट्य क्षेत्रातील विजय कुडाळकर व उमेश पावसकर यांच्या स्मृतीनिमित्त निर्मिती थिएटर्स कुडाळने गेल्यावर्षीपासून राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धांचे आयोजन सुरू केले. या सर्व एकांकिका नाट्य रसिकांसाठी पर्वणी ठरल्या. मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, दापोली आदी भागातून १७ संघ सहभागी झाले आहेत. पहिल्या दिवशी माध्यमिक विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेज कनेडीने संगीत भस्मासुर मोहिनी ही प्रा. आनंद सावंत दिग्दर्शित शेखर गवस लिखित एकांकिका सादर करण्यात आली. दशावतार लोककलेतील आघाडीचे कलाकार ओमप्रकाश चव्हाण यांच्या जीवनावर आधारित या एकांकिकेने अप्रतिम सादरीकरण केले. चव्हाण यांना नाटकाच्या वेळी हृदय विकाराचा झटका आला होता. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी मदतीसाठी नाट्यप्रयोग घेण्यात आला. जमलेला निधी कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात आल्याचे वास्तवतेचे दर्शन या एकांकिकेतून झाले. ग्रामीण भागातील त्याची कौटुंबिक स्थिती, त्यानंतर त्यांच्या मुलांनी मदतीसाठी दशावतारमध्ये केलेल्या भूमिका डोळ्याचे पारणे फेडणारे होते. सर्वच कलावंतानी आपल्या कलेला परिपूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न केला. या एकांकिकेतील सर्व कलाकारांमध्ये विठ्ठल गावकर हा १३ वर्षीय आठवीतील विद्यार्थी सर्वांच्या लक्षात राहिला.
या दिवशी कलावैभव थिएटर्स परुळेची दंगल चालू आहे, नांदी क्रिएशन दापोलीची लाल सलाम या एकांकिका झाल्या. लाल सलाममधील शेवटचा फाशीचा प्रसंग अप्रतिम होता. दुसऱ्या दिवशी सत्कर्ष ‘मुंबई दी एल्सिक्‍युशनर’ ही एकांकिका नाट्य रसिकांच्या पसंतीला उतरली. परफेक्‍ट टाईम परफेक्‍ट अभिनयाने नटलेल्या सजलेल्या या एकांकिकेत सर्वच कलावंतांनी अफलातून भूमिका साकारल्या. जल्लादचा अभिनय उत्कृष्ट होता. तेवढ्याच ताकदिची रसिक रंगभूमीची कविता ही एकांकिका होती आणि तेवढ्याच दर्जाची चतुरंग प्रतिष्ठान रत्नागिरीची पुरुषार्थ एकांकिका होती.

परीक्षकांसाठी स्पर्धेचा निकाल काढणे अतिशय कठीण काम ठरणार आहे. गोठोस भावई नाट्यविश्‍वची खेळ ऊन पावसाचा या एकांकिकामध्ये एखादा अपवाद वगळता सर्वांनी आपल्या अभिनयाला साजेसा न्याय दिला. संतोष बांदेकर यांची नानाची भूमिका चांगली होती. उद्या (ता. ६) सायंकाळी सात वाजता शिंदे ॲकॅडमी कोल्हापूरची राखेतून उडाला मोर, आठ वाजता महाविद्यालय मुंबईची कंट्रोल, नऊ वाजता अंतरंग थिएटर्स मुंबईची घुसमट, रात्री दहा वाजता अमरसिंधू कलामंच कणकवलीची बाजार एकांकिका होणार आहे.

Web Title: bhasmasur mohini drama