‘सायकल चालवा, शहर प्रदूषणुक्त ठेवा’ चा संदेश देत रत्नागिरीत फेरी

‘सायकल चालवा, शहर प्रदूषणुक्त ठेवा’ चा संदेश देत रत्नागिरीत फेरी

रत्नागिरी - ‘सायकल चालवा, फिट राहा आणि शहर प्रदूषणुक्त ठेवा’ असा संदेश रत्नागिरी सायकल क्लबने वीस किलोमीटर सायकल फेरी आयोजित केली होती. या फेरीला उदंड प्रतिसाद मिळाला. 100 नागरिक आणि 300 विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. सकाळी 6 वाजता नागरिकांची पहिली बॅच सुटली. त्यानंतर दोन बॅच सोडण्यात आल्या.

ही स्पर्धा नसल्याने सर्वजण सायकल सफारीचा आनंद लुटत होते. मार्गावर प्रत्येक ठिकाणी पाणी, बिस्कीट्स, एनर्जी ड्रिंकची उत्तम सुविधा दिली होती. जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि नगराध्यक्ष तसेच विविध सामाजिक संस्थांनी यात सहभाग नोंदवला.

सायकल क्लबच्या पुढाकाराने आणि वीरश्री ट्रस्ट, त्रिनीटी हेल्थ क्लबच्यावतीने फेरीचे आयोजन केले. आयटीआय येथील आठवडा बाजार येथे सकाळी 6 वाजता पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी श्रीफळ वाढवून व जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी झेंडा दाखवून फेरीचे उद्घाटन केले. त्यानंतर 100 नागरिकांनी हातखंब्याकडे कूच केले. उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, पोलिस निरीक्षक अनिल विभुते व शासकीय अधिकारी या वेळी उपस्थित होते. 6.30 वाजता नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी विद्यार्थ्यांच्या फेरीचे उद्घाटन केले व रोटरी क्लबचे ज्येष्ठ सदस्य धरमसी चौहान यांनी झेंडा दाखवला. विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण होते. त्यामुळे त्यांनी सुमारे दीड तासात फेरी पूर्ण केली.

डॉ. नीलेश शिंदे, डॉ. तोरल शिंदे, डॉ. निशीगंधा पोंक्षे, डॉ. नितीन दाढे आदींनी या फेरीचे काटेकोर नियोजन केले. त्यांना इंडियन मेडिकल असोसिएशन, जाणीव फाउंडेशन, रोटरी क्लब, लायनेस क्लब, लायन्स क्लब, संस्कार भारती, रत्नागिरी जिल्हा मराठी पत्रकार संघ, लेन्स आर्ट, बाबुराव जोशी गुरुकुल व अ‍ॅड. नानल गुरुकुल या संस्थांनी सक्रिय सहभाग नोंदवला. मार्गावर दहा ठिकाणी पाणी, बिस्कीट्सची सुविधा देण्याकरिता सहकार्य केले. तसेच क्रेडाई, गद्रे मरीन्स, हिंद सायकल, कार्निव्हल, ट्रॅक्वीलीटी यांचे सहकार्य लाभले.

रस्त्यांवर ‘सायकल ट्रॅक’

शहरातील रस्त्यांवर ‘सायकल ट्रॅक’ तयार करण्याची मागणी वीरश्री ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. नीलेश शिंदे यांनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडे केली. त्याला जिल्हाधिकार्‍यांनी सहमती दर्शवली. या फेरीत स्वतः जिल्हाधिकारी सहभागी झाले. त्यामुळे शहरात नव्याने होणार्‍या रस्त्यांच्या कडेला सायकल स्वारांसाठी ट्रॅक देण्याच्या प्रस्तावावर गांभिर्याने विचार करू, असे त्यांनी सांगितले.

महिन्यातून दोनदा ‘सायकल डे’

नगराध्यक्ष राहुल पंडित हेसुद्धा या फेरीत विनायक पावसकर आणि विद्यार्थ्यांसह सहभागी झाले. फेरी पूर्ण करून आल्यानंतर त्यांनी सांगितले की, हा उपक्रम खरोखर स्तुत्य आहे. त्यामुळेच महिन्यातून दोन वेळा ‘सायकल डे’ साजरा करता येऊ शकतो. त्या दिवशी दुचाकी, चारचाकीचा वापर न करता सायकलच वापरावी, असा विचार मांडला. याचे सायकल क्लबनेही स्वागत केले.

गेल्या पर्यावरण दिनापासून मी दररोज सकाळी सायकल चालवत आहे. आज पहिल्या सायकल फेरीत सहभाग घेतला त्यामुळे कोठेही न थांबता सलग 20 किलोमीटर सायकल चालवली. ही प्रेरणादायी फेरी असून यातून युवक फिटनेसकडेही लक्ष देतील.

- राजीव लिमये,

रा. कर्ले

डॉ. शिंदे दांपत्याने फेरीसाठी पुढाकार घेतला. या उपक्रमामुळे सायकल चालवण्याबद्दल व स्वतःच्या फिटनेसबद्दल नागरिकांमध्ये जागृती निर्माण झाली. यातून अनेक जण सायकल चालवण्यास उद्युक्त होतील. मी तीस वर्षांनंतर सायकल चालवली.

- अविनाश काळे

“मी इयत्ता चौथीपासून सायकल चालवत आहे. दररोज सायकल चालवत असल्याने मी वीस किमीचे अंतर सहज पार केले. महिन्यातून एकदा असा उपक्रम केल्यास आम्ही सारे विद्यार्थी यात सहभागी होऊ.”

- अजिंक्य शिंदे, इयत्ता आठवी, जीजीपीएस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com