अवैध दारू पुन्हा फोफावली

शिवप्रसाद देसाई
सोमवार, 3 डिसेंबर 2018

सिंधुदुर्गात मध्यंतरी न्यायालयाच्या आदेशामुळे बहुसंख्य अधिकृत बार बंद झाले. त्याचा गैरफायदा उठवून जिल्हाभर बेकायदा दारू विक्रीचे जाळे विणले गेले. याच्याच जोडीला सिंधुदुर्गमार्गे विविध राज्यात दारूच्या अनधिकृत वाहतुकीला सध्या पेव फुटले आहे. कोट्यवधीची उलाढाल असलेला हा काळा धंदा पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाकाखालून राजरोस सुरू आहे. खाकीतील काहींचा आशीर्वादही असल्याची चर्चा आहे. खुद्द राज्याच्या गृहराज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील हा ‘मद्य उद्रेक’ थांबवायचा कधी आणि कोणी? हाच मोठा प्रश्‍न आहे.

बंदीत शोधली संधी
सर्वोच्च न्यायालयाने १ एप्रिल २०१७ पासून महामार्गापासून ५०० मीटरपर्यंत आणि २० हजारपर्यंत लोकसंख्या असलेल्या गावापासून २२० मीटरपर्यंत दारू दुकाने बंदचा आदेश दिला होता. जिल्ह्यातील बहुसंख्य अधिकृत बार या निर्णयाच्या प्रभावाखाली आले. पुढे न्यायालयाच्या या बाबतच्या निर्णयात वेळोवेळी बदल झाले; मात्र या सगळ्या प्रक्रियेत जिल्ह्यातील बहुसंख्य अधिकृत बार जवळपास वर्षभर बंद राहिले. या बंदीत अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांनी संधी शोधली. त्यांनी जिल्हाभर अवैध दारू विक्रीचे नेटवर्क तयार केले. यात जुन्या अनधिकृत दारू विक्रेत्यांना बळ दिले गेले. पुढे अधिकृत बार सुरू झाले, तरी हे अनधिकृत नेटवर्क कायम आहे. यामध्ये सर्रास कमी दर्जाची, मोठ्या ब्रॅन्डच्या नावे बनावट दारू विक्री सुरू आहे. यातून शासनाचा महसूलही मोठ्या प्रमाणात बुडत आहे.

वाहतूक जोरात...साठवणुकीसाठी गोदाम गोव्यात पर्यटनामुळे दारूला कर सवलत आहे. त्यामुळे इतर राज्यांच्या तुलनेत दारू स्वस्त मिळते; मात्र ती गोव्याबाहेर विकायला बंदी आहे. शिवाय गोव्यात मोठमोठ्या ब्रॅन्डची बनावट दारू बनविण्याचा धंदाही जोरात चालतो. या दारूची गुजरात, महाराष्ट्र, आंध्र प्रदेशसह अनेक राज्यांत चोरटी वाहतूक चालते. कर्नाटक आणि महाराष्ट्र असे दोन मार्ग यासाठी उपलब्ध आहेत; मात्र कर्नाटकात अशा दारू वाहतुकीबाबतचे धोरण कडक आहे. शिवाय कर्नाटकात वेगवेगळ्या भागातील सुरक्षा यंत्रणा एकमेकांवर कुरघोडी करतात. तुलनेत महाराष्ट्रात सर्रास मुंबई-गोवा महामार्गाचा वापर केला जातो. सीमाभागात असल्याने सिंधुदुर्गातील तपासणी नाके पार केल्यास पुढे फारशा अडचणी येत नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातून अनधिकृत दारू वाहतुकीचे पेव कायम आहे. अगदी कंटेनर, ट्रक अशा मोठ्या वाहनांतूनही ही वाहतूक होते. यात काही कोटीचा महसूल बुडवला जातो. 

अनधिकृत दारू वाहतुकीसाठी सर्रास बनावट दारू वापरली जाते. त्याची निर्मिती दक्षिण गोव्यात होते. पूर्वी तेथूनच उचल केली जात असे. गेल्या वर्षभरात सिंधुदुर्गातील वाढलेली आवक लक्षात घेऊन दारू माफियांनी सीमाभागात गोदामे उभारली आहेत. दक्षिण गोव्यात तयार माल सिंधुदुर्गाच्या सीमेलगत गोव्यात साठवला जातो. मागणीप्रमाणे आणि मोक्‍याची वेळ साधून ही दारू ‘पास’ केली जाते. 

असे असते अर्थकारण
 मोठ्या कंटेनरमधून दारू वाहतूक
 एका फेरीला कोटीचा माल भरतात
 बहुतेक बाटल्या किमती ब्रॅंडच्या 
 सिंधुदुर्गातून दरमहा ३० ते ५० गाड्या जातात
 वर्षभराचा हा आकडा ५०० ते ६०० गाड्या 
 एकूण होणारी उलाढाल ६०० कोटी
 

शुक्राचार्यांची चांदी... जीवाशी खेळ
राज्य उत्पादन शुल्क आणि पोलिस यंत्रणा बेकायदा दारू वाहतूक व विक्रीवर नियंत्रणे ठेवते; मात्र यातीलच घरभेदी या कोट्यवधीच्या गैरधंद्याला हातभार लावतात. पूर्वी केवळ बेकायदा वाहतूक करणाऱ्यांकडून हप्ते घेतले जात असत. मधल्या काळात पोलिस अधीक्षक मल्लीकार्जुन प्रसन्ना, डॉ. रवींद्र शिसवे, अभिषेक त्रिमुखे यांच्या कार्यकाळात या शुक्राचार्यांना चाप बसला होता. बार बंदी काळात जिल्हाभर अवैध दारू विक्री धंदे सुरू झाल्याने हे शुक्राचार्य अधिक सक्रिय झाले. हप्तेखोरी वाढली. काहींनी विविध कारणे दाखवून मोक्‍याच्या ठिकाणांवर बदल्या करून घेतल्या. मध्यंतरी पिंगुळीत झिंगलेल्या स्थितीत सापडलेला ‘खाकीवाला’, त्यामुळे उठलेले चर्चेचे मोहोळ, सिंधुदुर्ग जिल्ह्याची हद्द पार करून गेलेल्या वाहनांवर अवैध दारूप्रकरणी झालेली कारवाई अशा कितीतरी घटना बोलक्‍या आहेत. त्यामुळे प्रामाणिक पोलिस कर्मचारीही बदनाम होत आहेत. राज्य उत्पादन शुल्कची पकड ढिली पडली आहे. वर्षानुवर्षे ठाण मांडून असलेल्या या खात्यातील शुक्राचार्यांबरोबरच जिल्ह्याबाहेर बदली झालेले काही जण आजही तोडपाणी करत असल्याची चर्चा आहे. राज्याच्या गृहराज्य मंित्रपदाची जबाबदारी जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे आहे. त्यांनी याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.

अवैध विक्रीमध्ये गोव्यात बनणाऱ्या बनावट दारूचे प्रमाण जास्त आहे. ती कमी किमतीत विकली जाते. याच्या निर्मितीसाठी अप्रमाणीत घटकांचा वापर होतो. यामुळे दारूचे व्यसन असणाऱ्यांच्या आरोग्याविषयी तक्रारी वाढल्या आहेत. लिव्हरला आघात होऊन मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. प्रामुख्याने तरूण पिढी ओढली जात आहे. अनेकांचे संसार उद्‌ध्वस्त होत आहेत. 

गोवा राज्यातून होणारी अवैध दारूची वाहतूक रोखण्यासाठी जिल्ह्यातील तपासणी नाक्‍यांवर काटेकोरपणे तपासणी केली जात आहे. या व्यतिरिक्‍त चोरट्या मार्गांचा शोध घेऊन पोलिस पथकामार्फत संशयित गाड्यांची तपासणी करण्यात येत आहे. आतापर्यंत अनेक जणांवर कारवाई करून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जिल्ह्यात अवैध दारू धंद्यांवर छापे टाकून कारवाई करण्याची मोहीम सुरूच आहे. अवैध दारू वाहतूक व विक्रीबाबत पोलिस यंत्रणा सतर्क असून, कडक कारवाईच्या सूचना दिल्या आहेत.
- दीक्षित गेडाम, 

जिल्हा पोलिस अधीक्षक, सिंधुदुर्ग

Web Title: Big story on illegal wine

टॅग्स