मुंबई-गोवा मार्ग चौपदरीकरण: कणकवलीचे ऐतिहासिक साक्षीदार होणार इतिहासजमा 

मुंबई-गोवा मार्ग चौपदरीकरण: कणकवलीचे ऐतिहासिक साक्षीदार होणार इतिहासजमा 

कणकवली - महामार्ग प्रकल्पबाधितांचे मोर्चे, उपोषण, आंदोलने तसेच राजकीय अडथळे पार झाल्यानंतर कणकवली शहरात महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू झाले आहे. पुढील वर्षा अखेरीस उड्डापुलासह चौपदरीकरणाचे काम पूर्ण होईल; मात्र, या चौपदरीकरणात गड आणि जानवली नद्यांवरील पूल, अनेक राजकीय सभांचे साक्षीदार ठरलेला बसस्थानकासमोरील पिंपळ आणि वटवृक्ष, अनेक पिढ्या सुखाने नांदलेली घरे, पन्नास वर्षांपूर्वीपासून सेवा देणारी दुकाने, हॉटेल्स आदी शहराच्या इतिहासाचे अनेक ज्ञात व अज्ञात साक्षीदार विस्मृतीत जाणार आहेत. 

कणकवलीची स्थापना 

कणकवली शहर हे अप्पासाहेब पटवर्धन यांची कर्मभूमी! 250 ते 300 वर्षापूर्वी गड आणि जानवली नदीच्या काठावर कणकवली शहर वसले. या शहरात 1843 मध्ये कलमठातील बाजारपेठ वसली. तशी नोंद कणकवलीचे तत्कालीन व्यापारी धोंडो महाडिक यांच्या डायरीत आहे. सुती कापडाची मॅंचेस्टर नगरी ते कला, संस्कृती, राजकीय आणि आर्थिक राजधानी अशी आजवरची कणकवली शहराची वाटचाल राहिली आहे. या कालावधीत शहराने अनेक चढउतार पाहिले. 
 
चार पिढ्यांची घरे इतिहास जमा 

शहरातील गड आणि जानवली नदीवर 1934 मध्ये ब्रिटिशांनी पूल बांधले. यानंतर होडी वाहतूक बंद होऊन नव्या पुलावरून वाहतूक सुरू झाली. त्यानंतर गड आणि जानवली नदी दरम्यानच्या महामार्गालगत अनेक कौलारू घरे उभी राहिली. त्यामध्ये आजतागायत चार ते पाच पिढ्या नांदल्या. तर त्यावेळी महामार्गालगत कौलारू असलेली हॉटेल्स व इतर दुकाने सिमेंट क्रॉंक्रिटची झाली. मात्र चौपदरीकरणानंतर या आठवणीच राहणार आहेत. 

गड, जानवली पूल तोडले जाणार 

1934 मध्ये प्रत्येकी सव्वा लाख रुपये खर्च करून गड आणि जानवली नद्यांवर पुलांची उभारणी झाली. त्यानंतर गेली 34 वर्षे कित्येक टनांचा भार सोसूनही विनादुरूस्ती अव्याहतपणे या ब्रिटिशकालीन पुलांनी सेवा बजावली, भार वाहिला. मात्र चौपदरीकरणात हे दोन्ही पूल तोडले जाणार आहेत. त्याठिकाणी नवीन सिमेंट क्रॉंक्रिटचे पूल उभारले जात आहेत. हा पूल ऐतिहासिक ठेवा असल्याने तो तसाच ठेवून त्यालगत नवीन पूल बांधावे, अशीही मागणी इतिहासप्रेमींची होती. 

वटवृक्ष इतिहास जमा 

शहरातील बसस्थानक आणि हॉटेल सह्याद्रीसमोरील वटवृक्षाने गेल्या शंभर वर्षात कावळे, चिमण्या व यासारख्या पक्षांना आधार दिला. त्याचप्रमाणे विविध राजकीय पक्षांच्या सभा आणि हाणामाऱ्या देखील या वृक्षाखाली गाजल्या. नवीन नेतृत्व उभी राहिली. प्रवाशांना सावलीही दिली. भजने, डबलबाऱ्या, विविध प्रदर्शने आणि आंबा विक्रेत्यांना हक्‍काचे स्थान देणारा वटवृक्ष चौपदरीकरणात नष्ट होणार आहे. 

बाजारपेठेचे महत्व संपणार? 

जानवली ते गडनदी हा दोन किलोमिटरचा टप्पा आहे. यातील उड्डाणपूल 1.20 कि.मी. आणि त्यापुढे प्रत्येकी तीनशे मिटरपर्यंत भराव असणार आहे. त्यामुळे संपूर्ण बाजारपेठ उड्डाणपुलाखाली जाणार आहे. साहजिकच वाहने शहरात न थांबता पुलावरून जाणार आहेत. त्याचा मोठा परिणाम शहर बाजारपेठेवर होण्याची शक्‍यता आहे. तर शहरालगतची जानवली, वागदे गावात नव्या बाजारपेठा उदयास येणार आहेत. 
 
45 पिलरचा उड्डाण पूल 

कणकवली शहरातील उड्डाणपुलाचा पहिला पिलर एस.एम.हायस्कूल येथे सुरू होणार आहे. तर शेवटचा पिलर कणकवली कोर्टासमोर असणार आहे. एकूण 1200 मिटर लांबीच्या या उड्डाणपुलाला 45 पिलर असणार आहे. 
 
असा आहे शहरातील रस्ता 

शहरातील उड्डाणपूल सहा पदरी असणार आहे. त्याखाली दुतर्फा सहा मिटरचे दोन सर्व्हिस रोड असणार आहेत. याखेरीज महामार्ग दुतर्फा पाच फुटाचा फुटपाथ, त्याखाली गटार, गटाराच्या बाजूलाच, जलनि: स्सारण वाहिनी, भूमिगत वीज वाहिन्या आणि विविध कंपन्यांच्या केबलसाठी पाच ते सात फुटाची जागा सोडली जाईल. पुलाखाली काही ठिकाणी रिक्षा आणि इतर पार्किंगसाठी जागा निश्‍चित होणार आहे. 
 
टोल नाक्‍यातून खर्च वसूल 

मुंबई -गोवा महामार्ग डिसेंबर 2019 पर्यंत पूर्ण करण्याचे टार्गेट ठेकेदार कंपन्यांना दिले आहे. तर 2020 पासून टोलनाका सुरू होणार आहे. सिंधुदुर्गात दिलीप बिल्डकॉन कंपनीचा टोलनाका ओसरगाव येथे तर केसीसी बिल्डकॉनचा टोलनाका राजापूर येथे असणार आहे. 
 
कणकवली शहरात उड्डाणपूल होत असल्याने त्याचा बाजारपेठेवर संमिश्र परिणाम होईल. हॉटेल, लॉजिंग व्यावसायिकांना मोठा परिणाम जाणवेल; मात्र इतर शहराबाहेर नव्या बाजारपेठा तयार होणार आहेत. त्यादृष्टीने इथल्या व्यापाऱ्यांनी आपल्या व्यवसायाची विस्तार योजना बनवायला हवी.
- अशोक करंबेळकर,
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा वृत्तपत्र व्यावसायिक 

माझ्या आजोबांनी 1942 मध्ये उभ्या केलेल्या या दुकानवजा घरात किराणा दुकाननंतर मंगलोरी कौले आणि सिमेंट आणि सगळ्यात शेवटी काच उद्योग उभा राहिला. अनेक पिढ्यांचे साक्षीदार असलेलं हे घर आज चौपदरीकरणात जात असलं तरी विकासासाठी हातभार लावला जातोय, याचंही समाधान आहे.
- शिशिर परुळेकर,
प्रकल्पग्रस्त 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com