"कोकण रॉयल' एमटीडीसीचा पांढरा हत्ती

शिवप्रसाद देसाई
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

तब्बल 5 कोटी 41 लाख 4875 गुंतवून चार वर्षात 51 लाख 60 हजार उत्पन्न मिळवणारा वाहतुक व्यवसाय चालवायला "धाडस' लागते. ते महाराष्ट्र पर्यटन महामंडळ अर्थात एमटीडीसीने केले आहे. तेही कोकणात पर्यटन वाढीच्या नावाखाली. आता "त्या' गाड्यांचे अर्धे अधिक आयुष्य संपल्याने नफा सोडाच, मुद्‌दल मिळण्याची आशाही धुसर झाली आहे.

तब्बल 5 कोटी 41 लाख 4875 गुंतवून चार वर्षात 51 लाख 60 हजार उत्पन्न मिळवणारा वाहतुक व्यवसाय चालवायला "धाडस' लागते. ते महाराष्ट्र पर्यटन महामंडळ अर्थात एमटीडीसीने केले आहे. तेही कोकणात पर्यटन वाढीच्या नावाखाली. आता "त्या' गाड्यांचे अर्धे अधिक आयुष्य संपल्याने नफा सोडाच, मुद्‌दल मिळण्याची आशाही धुसर झाली आहे. कोकणात पर्यटन वाढीच्या गोंडस नावाखाली महाराष्ट्र पर्यटन महामंडळाच्या या प्रकल्पातून पर्यटनवृध्दी किती झाली हा संशोधनाचा विषय आहे; मात्र पांढरा हत्ती पाळणे म्हणजे काय याचे भक्‍कम उदाहरण तयार झाले आहे. एमटीडीसीच्या "कोकण रॉयल' या पाच मल्टी एक्‍सेल कोच व्हॉल्वो गाड्यांचा गेल्या पाच वर्षातील प्रवास आणि विश्रांती हा कोकण पर्यटन विकासासाठी शासनाकडून कशा पध्दतीचे "रॉयल' प्रयत्न चालतात हे सांगायला पुरेसा आहे. 

 "कोकण रॉयल'चे आगमन 
कोकणात पर्यटन वाढीसाठी गेली 10-15 वर्षे शासन पातळीवर काथ्याकुट सुरू आहे. यावर करोडो रूपये खर्चही झाले; पण त्याचे "रिझल्ट' फारसे दिसले नाहीत. कोकण रॉयल व्हॉल्वो हा यातलाच एक प्रकार. कोकणात पर्यटकांना आणण्याच्या हेतूने शासनाने "पॅकेज टूर'साठी गाड्या खरेदीची संकल्पना मंजूर केली. सुरवातीला कोकणात अंतर्गत प्रवासासाठी छोट्या गाड्या घेण्याबाबत चर्चा होती; पण अंमलबजावणीवेळी मात्र मल्टी एक्‍सेल व्हॉल्वो खरेदीचा निर्णय झाला. तब्बल 5 कोटी 41 लाख 4875 इतकी रक्‍कम खर्च करून आलीशान व्होल्वो एमटीडीसीच्या ताब्यात आल्या. कोकण रॉयल असे याचे बारसे झाले. 

कसा होता मार्ग? 
या गाड्यांचा मार्ग कोणता होता याची माहिती सावंतवाडीतील पर्यटन व्यावसायिक डि. के. सावंत यांनी माहितीच्या अधिकारात घेतली. यानुसार हा मार्ग पुणे-नागपूर-पुणे (मुंबई-पुण्यातून नियमीत) पुणे-गणपतीपुळे-पुणे (मुंबईतून नियमीत) असा सांगितला. ही गाडी महाराष्ट्राच्या बऱ्याच प्रांतात फिरली; मात्र पर्यटन विकासाची गरज असलेल्या तळकोकणातील पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गासह रत्नागिरीच्या इतर भागात पोचली नाही. त्यामुळे इतक्‍या मोठ्या खरेदीमागचा मुळ हेतू साध्य होण्यासाठी किती नियोजन झाले, हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

ठेकेदाराची नियुक्‍ती 
एमटीडीसीने व्होल्वोच्या खरेदीनंतर गाड्या चालवण्यासाठी ठेकेदार कंपनी नियुक्‍त केली. लांबलचक अटीशर्थीचा करार करत या गाड्या त्यांच्या स्वाधीन केल्या. ठेकेदाराशी चार वर्षाचा करार झाला. कोकण रॉयलच्या नावाखाली या गाड्या पूर्ण महाराष्ट्रात फीरू लागल्या. नाव मात्र कोकण पॅकेज टूरचे होते. औरंगाबाद, नगरसह सर्व भागातील पर्यटक कोकणात आणले जात असल्याचे दावे झाले. यातून कोकणच्या पर्यटन विकासासाठी किती फायदा झाला हा संशोधनाचा विषय आहे. 

बाराण्याचा मसाला... 
कोकणात "चाराण्याची कोंबडी, बाराण्याचा मसाला' अशी एक म्हण आहे. कोकण रॉयलमधून मिळालेल्या उत्पन्नाचा आकडा पाहता याची प्रचीती येते. या गाड्या खरेदी करताना कोकण पर्यटन विकास हा मुख्य हेतू होता. असे असले तरी एमटीडीसी लोकांना पर्यटन कसे करावे याचे धडे देते. त्यांची अनेक हॉटेल्स व इतर पर्यटन प्रकल्प आहेत. यामुळे या प्रकल्पातून नफा नको किमान मुद्‌दल तरी वसुल होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात 7 लाख 50 हजारापासून याचे उत्पन्न सुरू झाले. चार वर्षात अवघे 51 लाख 60 हजार इतके एकूण उत्पन्न मिळाले. 5 कोटी 41 लाख 4875 गुंतवणूकीतून मिळालेले हे उत्पन्न विचार करायला लावणारे आहे. या खरेदीमागे फायदा मिळवणे हा हेतू नसला तरी किमान मुद्‌दल तरी वसुल होणे आवश्‍यक होते. कारण पर्यटन व्यावसायिक एमटीडीसीच्या प्रकल्पांकडे रोल मॉडेल म्हणून पाहतात. 

पांढरा हत्ती पोसताना 
वाहतूक व्यवसायात साधारण एका गाडीचे फायदा मिळवून देण्याचे आयुष्य 6 ते 7 वर्षे असते. त्यातही पहिल्या पाच वर्षात जास्त उत्पन्न मिळवायचे असते. कोकण रॉयलबाबत एमटीडीसीने संबंधित ठेकेदाराशी केलेला करार 2017 मध्ये संपला. यानंतर ठेकेदारांनी आपणास पुढे कराराची मुदत वाढविण्यात स्वारस्य नसल्याचे कळवले. आता या गाड्या गेले जवळपास वर्षभर त्या ठेकेदाराच्या गॅरेजमध्ये विश्रांती घेत आहेत. गाड्या गॅरेजमध्ये उभ्या करून ठेवण्यासाठी त्या ठेकेदाराने प्रतिगाडी, प्रतिमहिना पाच हजार मासिक भाडे देण्याची सुचना केली आहे. एमटीडीसीने पुढील निविदा प्रक्रीया अद्याप सुरू केलेली नाही. अशा लक्‍झरी गाड्या चालू स्थितीत न राहिल्यास त्याचा देखभाल खर्च वाढण्याची भीती असते. त्यामुळे या गाड्या म्हणजे पांढरा हत्ती पोसण्याचा अनुभव एमटीडीसीला येत आहे. 

तोट्याचे गणित 

  • व्हॉल्वो खरेदिसाठी आलेला खर्च - 5, 41, 04875 
  • मिळालेले उत्पन्न 

2013-14 - 7,50,000 

2014-15 - 9,90,000 

2015-16 - 14,85,000 

2016-17 - 19,35,000 

  • एका गाडीपासून मिळालेले सर्वसाधारण उत्पन्न - 12,90,000 

"कोकण रॉयल गाड्यांचा करार संपला आहे. आता नव्याने निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे. या गाड्या कोकण पर्यटन विकासासाठी होत्या. महाराष्ट्राच्या नागपूरसह इतर भागातून कोकणात पर्यटक आणले गेले. याबाबत आणखी माहिती हवी असल्यास एमटीडीसीच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांना येवून भेटावे लागेल.'' 
- सुनिल येताळकर,
एमटीडीसी, मुंबई 

"या गाड्या कोकणासाठी घेतल्या तरी त्या या भागात फारशा फिरल्याच नाहीत. कोणत्याही गाडीचे व्यवसायवृध्दीचे खरे वय पहिली पाच वर्षेच असते. या काळात मिळालेले उत्पन्न कवडी मोल आहे. शिवाय कोकणच्या पर्यटनालाही याचा फायदा झाला नाही. एमटीडीसीने असे अव्यवहार्य प्रकल्प राबविण्यापेक्षा पर्यटन विकासासाठी प्रामाणिक काम करणाऱ्या व्यावसायिकांना पाठबळ द्यावे. हेच साडेपाच कोटी एखाद्या पर्यटनस्थळी पायाभूत सुविधांसाठी वापरले असते तर त्याचे रिझल्ट नक्‍की दिसले असते.'' 
- डि. के. सावंत,
पर्यटन व्यावसायिक. 

"मुळात हा निधी कोकणात पर्यटन वाहतूक सुविधांसाठी होता. यातून छोट्या गाड्या घेवून त्यातून कोकणात पर्यटन स्थळांपर्यंत अंतर्गत सुविधा निर्माण करणे अपेक्षीत होते; मात्र अचानक ते धोरण बदलून महागड्या व्हॉल्वो घेतल्या. हा निर्णय कसा झाला हे अनाकलनीय आहे.'' 
- भाई देऊलकर,
सामाजिक कार्यकर्ते 

Web Title: Big story on Konkan Royal MTDC