गुहागर-विजापूर मार्गाचा चिपळूणला बायपास

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 ऑगस्ट 2016

गुहागर-विजापूर महामार्ग शहरातून जाणार नसताना बहादूरशेख नाका ते मिरजोळीपर्यंतच्या रस्त्याचे सर्वेक्षण सुरू झाले आहे. याचे कारण राष्ट्रीय महामार्ग विभागाने स्पष्ट करावे. नागरिकांची दिशाभूल होणार नाही, याची काळजी अधिकाऱ्यांनी घ्यावी.
- शशिकांत मोदी, नगरसेवक, चिपळूण
 

चिपळूणमधून जाणाऱ्या पूर्वीच्या राज्य महामार्गाची सद्यपरिस्थिती काय आहे, याची माहिती घेण्यासाठी कोल्हापूर येथील राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून सर्वेक्षण सुरू आहे. भविष्यात रस्त्याची डागडुजी करण्याची गरज लक्षात घेऊन सर्वेक्षण सुरू आहे
- शंकर सोनावणे, उपअभियंता; राष्ट्रीय महामार्ग विभाग चिपळूण

चिपळूण :  नव्याने अस्तित्वात येणारा गुहागर-चिपळूण-विजापूर राष्ट्रीय महामार्ग मिरजोळीतून पागकडे जाणाऱ्या बायपासमार्गे बहादूरशेख नाक्‍याला मिळणार आहे. त्यामुळे शहराला बायपास करून महामार्ग जाणार हे आज स्पष्ट झाले. या राज्य मार्गाची सद्यपरिस्थिती तपासण्यासाठी सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. 

राष्ट्रीय महामार्ग कोल्हापूर विभागाकडून सर्वेक्षणासाठी खासगी एजन्सीची नेमणूक करण्यात आली आहे. येथील राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपअभियंता यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला. गुहागर-चिपळूण-विजापूर मार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर झाल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काही महिन्यांपूर्वी केली; मात्र अद्याप हा राज्य महामार्ग राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग झालेला नाही. पूर्वीचा राज्य मार्ग चिपळूण शहरातून जातो. राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे हा मार्ग वर्ग झाल्यानंतर तो चिपळूण शहरातून न नेता मिरजोळी येथील बायपासमार्गे पाग पॉवरहाउस येथे बाहेर पडून मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला मिळेल. बहादूरशेख नाक्‍यावरून पुन्हा या राष्ट्रीय महामार्गाची हद्द सुरू होईल, अशी रचना करण्यात आली आहे.

चिपळूण शहरातील बहादूरशेख नाका ते मिरजोळीपर्यंतच्या जुन्या रस्त्याचे सर्वेक्षण आजपासून सुरू झाले आहे. मुंबईतील जे. जे. मुंबई ही खासगी एजन्सी सर्वेक्षण करीत आहे. पहिल्या टप्प्यात बहादूरशेख नाका ते मार्कंडी या दरम्यानच्या रस्त्याचे सर्वेक्षण झाले. रस्त्याच्या मध्यभागापासून दोन्ही बाजूने पंधरा-पंधरा मीटरपर्यंतचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

Web Title: Bijapur-way bypass Guhagar Chiplun