जैवविविधता दिन विशेषः हवी पर्यावरणपूरक रोजगार निर्मिती 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मे 2020

जैवविविधतेचे जतन होईल आणि पर्यावरणपूरक रोजगार निर्मिती आणि शेती, पर्यटनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त रोजगार निर्मिती होईल असे धोरण आखले पाहिजे, असे मत पर्यावरण अभ्यासक प्रतीक मोरे यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केले. 

रत्नागिरी - जिल्ह्यात आपला राज्य प्राणी शेकरू, राज्यपक्षी हरियल, राज्य फुलपाखरू ब्लू मॉर्मन, राष्ट्रीय पक्षी मोर असे सर्व मोठ्या संख्येने आढळून येतात. अंदाजे 300 हून जास्त प्रजातीचे पक्षी, 170 हून जास्त प्रजातीची फुलपाखरे आणि बिबट्या, कोल्हे, रानकुत्रे, गवे, साळींदर असे वन्य प्राणीसुद्धा येथे सहजतेने आढळतात. जैवविविधतेचे जतन होईल आणि पर्यावरणपूरक रोजगार निर्मिती आणि शेती, पर्यटनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त रोजगार निर्मिती होईल असे धोरण आखले पाहिजे, असे मत पर्यावरण अभ्यासक प्रतीक मोरे यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केले. 

जैवविविधता दिनाच्या पूर्वसंध्येला ते म्हणाले, कोरोना साथीमुळे "गावाकडे चला' हा संदेश मिळाला आहे. आता गावे स्वयंपूर्ण होतानाच पर्यावरणपूरक व्हावी. एका बाजूला अरबी समुद्राचे विशाल रूप तर दुसऱ्या बाजूने सह्याद्रीचे राकट कडे यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात प्रचंड भौगोलिक वैविध्य आढळते. जैवविविधतेने नटलेला अत्यंत समृद्ध, संपन्न असा हा परिसर निर्माण झाला. ज्वालामुखींच्या उद्रेकामुळे निर्माण झालेले कातळकडे, गवताळ मैदाने आणि सडे सागराच्या अथांग पसरलेल्या किनाऱ्यांची साथ यामुळे जैवविविधता विस्तारली. 

कोकणामध्ये प्रामुख्याने पक्षी, प्राणी, विविध उभयचर, सरपटणारे प्राणी, फुलपाखरे, असंख्य प्रजातीचे कीटक यांचा समावेश होतो. आंतरराष्ट्रीयदृष्ट्या तस्करी होणारे खवले मांजरांचा अधिवासही जिल्ह्यामध्ये आढळून आला आहे. गावकऱ्यांनी गाव देवळांच्या शेजारी छोट्या-छोट्या देवराया वर्षानुवर्षे राखून ठेवल्या आहेत. त्यामुळे पशुपक्ष्यांना अभय मिळाले आहे, असे मोरे म्हणाले. 

सड्यांचे वैशिष्ट्य म्हणजे पावसाळी महिन्यांमध्ये येथे कासच्या पठाराप्रमाणे मोठ्या प्रमाणात कातळावरची फुले उगवतात. सगळे विहंगम दृश्‍यांमध्ये रूपांतरित होतात. सागरी किनाऱ्यांवर ती अलीकडेच आंजर्ले, मुरुड, गावखडी या ठिकाणी कासव महोत्सवाच्या माध्यमातून संवर्धन आणि पर्यटनसुद्धा बहरू लागले असल्याचे मोरे यांनी सांगितले. 

माणूस व वन्य प्राण्यांचा संघर्ष 

लोकसंख्या वाढीमुळे वेगवेगळे नागरी प्रश्‍न निर्माण होत आहेत. समुद्रात होणारी अमर्याद मासेमारी, वन्य प्राण्यांची शिकार आणि तस्करी, इंधनासाठी वृक्षतोड, इमारती लाकडाची तस्करी असे प्रश्‍न आहेत. अमर्यादित गुरे चराई, जंगलांमध्ये माणसांचा वावर वाढल्यामुळे वन्यप्राणी म्हणजेच बिबटे, गवे आणि रानकुत्रे आता मानवी वस्तीमध्ये येऊ लागले आहेत. यातून माणूस आणि वन्य प्राणी यांचा संघर्ष आता नित्यनेमाने दिसू लागला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bio Diversity Day Special Eco Friendly Employment Generation Needed