बायोगॅस प्रकल्पासह उत्पन्नवाढीसाठी पावले

बायोगॅस प्रकल्पासह उत्पन्नवाढीसाठी पावले

रत्नागिरी - रत्नागिरीवासीयांच्या खिशाला कोणतीही चाट न लावणारे अंदाजपत्रक आज सर्वानुमते मंजूर करण्यात आले. २०१७-१८ मूळ अंदाजपत्रक ११७ कोटी ३६ लाखांचे आणि २०१६-१७ चे ९ कोटी ६ लाखांचे सुधारित शिलकीचे अंदाजपत्रक सादर झाले. शहरासाठी बायोगॅस प्रकल्पासह नवीन नळ-पाणी योजनेसाठी १७ कोटी रुपयांची तरतूद हे अर्थसंकल्पाचे एक वैशिष्ट्य आहे. त्याचबरोबर विकासकामांची अंदाजपत्रके तत्काळ पूर्ण करता यावीत, यासाठी आर्किटेक्‍ट पॅनेलची नेमणूक करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही घेण्यात आला.

नगराध्यक्ष राहुल पंडित यांच्या अध्यक्षतेखाली अंदाजपत्रक मंजुरीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व नगसेवक उपस्थित होते. सभेच्या सुरवातीला पालिकेच्या लेखाधिकाऱ्यांनी अंदाजपत्रकातील तरतुदींचे वाचन केले. २०१६-१७ वर्षात सुधारित अर्थसंकल्पात १२५,७९,३३,४९४ रुपये जमा आहेत. त्यातील ११६,७३,२०,५०० रुपये खर्च असून ९ कोटी ६ लाख १२ हजार ९९४ रुपये शिल्लक राहतील. २०१७-१८ या वर्षांमध्ये ११७,३६,९१,९९४ रुपये जमेचे अंदाजपत्रक सभागृहात सादर करण्यात आले. त्यातील ११३,२६,३७,००० रुपये खर्च होणार आहेत, तर ४,१०,५४,९९४ रुपये शिलकीचा अंदाज आहे. शिक्षण विभागासाठी गतवर्षी पाच लाखांची तरतूद होती. यावर्षी ती दुप्पट केली आहे. बांधकाम विभागासाठी २० कोटींची तरतूद केली आहे. त्यात चार कोटी रुपये रस्ते दुरुस्तीसाठी वेगळे ठेवण्यात आले आहेत. त्यातही वाढ केली आहे. अंदाजपत्रके तयार नसल्याने ही कामे सुरू करण्यास उशीर होतो. त्यासाठी आर्किटेक्‍ट पॅनेल तयार केले आहे. तीस लाख रुपये मंजूर केले आहेत. कामाचा आराखडा तयार करून मंजुरीसाठी आवश्‍यक कागदपत्रे हे पॅनल तयार करणार आहे.

रत्नागिरीतील घनकचरा प्रकल्पाचा प्रश्‍न लवकरच मार्गी लावण्यात येणार आहे. बायोगॅस प्रकल्प शहरात उभारला जाणार असून त्यासाठी दीड कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पाणीपुरवठा विभागासाठी २२ कोटी ५० लाख रुपयांची तरतूद केली आहे. त्यात मुख्यमंत्र्यांनी मंजूर केलेल्या नळ-पाणी योजनेसाठीचे १७ कोटी रुपये जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. त्या व्यतिरिक्‍त शहरातील छोट्या नळजोडण्यांच्या दुरुस्तीसाठी अडीच लाखांचा वेगळा निधी ठेवण्यात आला आहे. अनेक ठिकाणी जलवाहिन्या जीर्ण झाल्या आहेत. त्यांची दुरुस्ती करणे आवश्‍यक आहे. पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. महिला व बालकल्याण विभागासाठी ४५ लाख २० हजार रुपयांची तरतूद आहे. शहरातील उद्याने सुशोभीकरणासाठी ४० लाख रुपये वेगळे ठेवण्यात आले आहेत. दोन स्मशानभूमींच्या विकासासाठी दोन कोटी रुपये जिल्हा नियोजनमधून मिळणार आहेत.

शाळा दुरुस्तींसाठीचा निधी अपुरा
सर्वसमावेशक आणि नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने निर्णय घेणारा अर्थसंकल्प आहे, अशा प्रतिक्रिया शिवसेनेचे उपनगराध्यक्ष राजेश सावंत, विरोधी पक्षाचे नगरसेवक उमेश कुळकर्णी, सुदेश मयेकर, शिवसेना नगरसेवक किशोर मोरे यांनी व्यक्‍त केली. श्री. सावंत म्हणाले की, पालिकेच्या मालमत्तांमधून उत्पन्न वाढविण्यासाठी या अंदाजपत्रकात प्रयत्न केले आहेत. शाळांच्या दुरुस्तीसाठी केलेली ३५ लाखांची तरतूद अपुरी आहे. त्यासाठी जादा निधी लागणार आहे. त्यादृष्टीने तरतूद करावी. तसेच अंदाजपत्रक तयार करण्यासाठी कर्मचारी नाहीत, असा प्रश्‍न उद्‌भवू नये याची काळजीही घेतली पाहिजे.

निधी भाजपकडूनच...
भाजपच्या नगरसेवकांनी मुख्यमंत्री किंवा अन्य मंत्र्यांकडून जादा निधी आपापल्या प्रभागात आणावा. त्यातून शहराचा विकास होईल, अशी सूचना श्री. सावंत यांनी केली. यावर उमेश कुलकर्णी म्हणाले की, शहराला मुख्यमंत्र्यांनी मंजूर केलेल्या नळ-पाणी योजनेचा १७ कोटींचा पहिला हप्ता जिल्हा प्रशासनाकडे जमा आहे. तो निधी भाजपच्या माध्यमातूनच आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com