तहानलेल्या पक्षांची घरी मांदीयाळी 

तहानलेल्या पक्षांची घरी मांदीयाळी 

रत्नागिरी - उन्हाळ्याच्या झळा माणसाबरोबर पक्षी, प्राण्यांनाही बसू लागल्या आहेत. येथील पक्षीप्रेमी व हौशी छायाचित्रकार नेत्रा आपटे या त्यांच्या घरी अनेक वर्षे पाणी ठेवत आहेत. पाणी कुठे ठेवावे, कधी ठेवावे, याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत. याप्रकारे पक्षीप्रेमींनी पाणी ठेवून भूतदया दाखवावी, असे आवाहन आपटे यांनी केले आहे. 

त्यांनी सांगितले की, पावसाळ्याचे चार महिने सोडले तर आपल्याकडे ऑक्‍टोबर ते जूनपर्यंत उन्हाळा जाणवतो. आपण पक्ष्यांसाठी पाणी ठेवले तर घरबसल्या अनेकविध पक्षी बघायला मिळतात. फ्लॅटच्या खिडकी, बाल्कनीत मातीच्या भांड्यात पाणी ठेवावे. प्लॅस्टिकचा टब किंवा बशी वापरू नये, त्यात पाणी गरम होते. 

पक्षी महिनाभर निरीक्षण करतात. आधी थोडे लांब बसतात, काही धोका नाही, अशी खात्री झाल्यावर पाणी प्यायला येतात. त्यामुळे पाणी ठेवू त्या आजूबाजूला त्यांना बसता येईल, अशी जागा असावी किंवा एखादी फांदी, काठी आणून बांधावी. घर असल्यास भांडे जमिनीवर न ठेवता थोडे उंचावर ठेवावे. गडगा, विहीर, झाडाच्या फार उंच नसलेल्या फांदीला पण भांडे तारेने मजबूत बांधून टांगावे. 4 दिवसांतून भांडे धुवून ठेवावे. कारण त्यात शेवाळ धरते किंवा पक्षी त्यात आणून टाकतात, असे त्यांनी सांगितले. 

नेत्रा आपटे म्हणाल्या की, पाणी ठेवल्यावर पक्षी ठराविक वेळेला येतात. कावळे व कबुतरे कधीही येतात. ते आले की, मात्र बाकीच्यांना पाणी पिऊ देत नाहीत. पहाटे व संध्याकाळी उशिरा दयाळ, चिमण्या, कोकिळ, कोकिळा येतात. दुपारी 1 ते 2.30 पर्यंत बुलबुल, इंडियन रॉबिन (भारतीय दयाळ) नर आणि मादी येतात. दुपारनंतर पुन्हा बुलबुल आंघोळ करतात. तेव्हा चिमण्या व बुलबुल यांची भांडणही होतात.

अनेकदा बुलबुल 2-2 जण पाण्यात उतरतात. कधी सातभाई येतात. ठिपकेवाली मुनिया, काळी पांढरी मुनिया पाणी पितात. सनबर्ड (शिंजिर) खूपच तहान लागली तर पाणी पितात. 8 ते 9 च्या दरम्यान साळुंख्या पाणी प्यायला व आंघोळ करायला येतात. इंडियन यलो टिट, कॉमन आयरा, रुफोस ट्रीपई, कोतवाल आदी पक्षीही येतात. आमच्या घरी हा अनोखा पक्षीमहोत्सवच भरतो. 

विणीचा हंगाम 

फेब्रुवारी, मार्चपासून अनेक पक्षांचा विणीचा हंगाम सुरू होतो. जोडीदार मिळवण्यासाठी, घरटी बांधण्यासाठी त्यांची धावपळ, लगबग सुरू असते. त्यावेळी पाण्याच्या भांड्यावरही दोन नरांमधील भांडणे बघायला मिळतात. पक्षांचे जग हे वैविध्यपूर्ण आहे. त्यातून आपल्यालाही शिकायला मिळते. पाण्याबरोबर खायला ठेवू नये, कारण आपले खाणे हे पक्षांसाठी हानीकारक ठरू शकते. धान्य, भात, पोळी, फरसाण, उरलेली भाजी ठेवू नये, असेही आपटेंनी स्पष्ट केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com