कुडाळमध्ये शिवसेनेविरोधात भाजप आक्रमक 

कुडाळमध्ये शिवसेनेविरोधात भाजप आक्रमक 

सिंधुदुर्गनगरी - आमदार तथा कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना उमेदवार वैभव नाईक यांचा पक्षप्रवेशाचा वारु सुसाट असताना या मतदारसंघातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी त्याला लगाम घालण्याची तयारी केली आहे.

नाईक हे केवळ निवडणुकीपुरते युतीचा धर्म मानतात. नंतर युती धर्म मानत नाहीत. त्यामुळे युतीचा उमेदवार म्हणून आमदार नाईक उमेदवार नकोत. भाजपचा उमेदवार द्या, अशी मागणी केल्याची माहिती जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

येथील वसंतस्मृती या भाजपच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत पक्षाचे जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत, उपाध्यक्ष बाबा मोंडकर, राजू राऊळ, जिल्हा प्रसिद्धिप्रमुख नीलेश तेंडुलकर, मालवण अध्यक्ष विजय केनवडेकर, कुडाळ अध्यक्ष चारुदत्त देसाई, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भाई सावंत, नगरसेवक गणेश कुशे आदींसह 100 पदाधिकारी उपस्थित होते. 

2014च्या लोकसभा निवडणुकीपासून भाजप आतापर्यंत प्रामाणिकपणे युतीचा धर्म पाळत आहे; मात्र शासनाच्या कोणत्याही उपक्रमाच्या शुभारंभाला भाजपला निमंत्रित केले नाही. भाजपच्या मंत्र्यांनी मंजूर केलेली अनेक कामे त्यांनी आपण पाठपुरावा केल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले. केवळ महत्वाच्या निवडणुका जवळ आल्यावर भाजपला गोंजारण्याचे काम नाईक करतात. केव्हाही युतीच्या पदाधिकाऱ्यांची समन्वय बैठक झालेली नाही. ज्या ठिकाणी भाजपचे प्राबल्य आहे, त्याठिकाणी भाजपच्या पाठित खंजीर खुपसण्याचे काम त्यांनी केले आहे, असाही आरोप सावंत यांनी केला. 

लोकसभेला आमचा शिवसेनेला विरोध होता. पक्षादेश आल्याने प्रामाणिक काम केले; मात्र आता ती स्थिती नाही. आमचा विरोध पक्षाध्यक्षांच्या आदेशानंतरही मावळणार नाही. आमदार नाईक यांचे राजकारण स्वार्थी आहे. त्यांच्या कार्यपद्धतीवर भाजपची तीव्र नाराजी आहे. त्यांनी पारंपरिक मच्छीमारांबाबत भूमिका जाहीर मांडलेली नाही. "सी-वर्ल्ड'ची भूमिका घेतली नाही. सुरेश प्रभू यांनी सीआरझेड प्रश्‍न केंद्रात लावून धरत राज्य शासनाला धोरण ठरविण्याचे आदेश दिलेले असताना शिवसेनेचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी हा विषय मुद्दाम दाबून ठेवला. त्यामुळे आमदार नाईक यांना सहकार्य न करण्याचा निर्णय प्रभारी अतुल काळसेकर, संपर्कमंत्री रविंद्र चव्हाण यांना कळविला आहे. आता प्रदेशला कळविणार आहोत, असेही यावेळी सांगण्यात आले. 

शिवसेनेने युतीचा धर्म तोडला 
पारंपरिक पद्धतीने कणकवली मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आला आहे. तरीही भाजपने याठिकाणी नको तो उमेदवार दिला तर शिवसेना स्वतंत्र उमेदवार उभा करेल, असे शिवसेनेने जाहीर केले होते. त्याचवेळी त्यांनी युतीचा धर्म तोडला. भाजपने कोणाला घ्यायचे हे शिवसेना जाहीर करते. त्यांना कोणी अधिकार दिला? ते काही नेत्यांवर जिल्ह्याचे नेते राहिल्याची टीका करतात. मुळात तुम्ही केवळ मतदारसंघाचे नेते आहात, याचे भान ठेवा, असे खडेबोल बाबा मोंडकर यांनी सुनावले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com