भाजप व शिवसेनेचे सदस्य यांच्यात 'या' नियोजनावरून धूडगूस...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 जानेवारी 2020

जिल्हा परिषद सभा; भाजप शिवसेना सदस्य आमने-सामने, मतदानाचा मुद्दा घेताच विरोध मावळला.... 

ओरोस (सिंधुदूर्ग) : राज्यस्तरीय कृषी पशु पक्षी प्रदर्शनाचे ठिकाण व निर्णय घेण्याच्या विषयावरुन भाजप व शिवसेनेचे सदस्य यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. हे प्रदर्शन कुडाळ तहसिलच्या आवारात घेण्यात यावे, अशी मागणी करणारी शिवसेनेची सूचना भाजपच्या सदस्यांनी धुडकावून लावली. प्रदर्शनादरम्यान कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार हा जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांना देण्याच्या रणजित देसाई यांच्या सूचनेला शिवसेनेने विरोध केला. आपण विरोध करत असाल तर मतदान घेऊया, अशी शक्कल भाजपच्या सदस्यांनी लढवताच शिवसेनेचा विरोध मावळला. अखेर 6 ते 9 फेब्रुवारीला तेर्सेबाबंडे येथे कृषी पशु पक्षी प्रदर्शनाची तारीख निश्‍चित करण्यात आली. या प्रदर्शनासाठी 32 लाख निधीही मंजूर करण्यात आला.
 
जिल्हा परिषद विशेष सभा अध्यक्ष समिधा नाईक यांच्या अध्यक्षतेखाली येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झाली. यावेळी उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, विषय सभापती रवींद्र ऊर्फ बाळा जठार, सावी लोके, शारदा कांबळे, माधुरी बांदेकर, समिती सचिव तथा पाणी व स्वच्छता मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश जोंधळे, सदस्य प्रदीप नारकर, संजना सावंत, रणजित देसाई, दादा कुबल, नागेंद्र परब, अमर सावंत,अंकुश जाधव, रेश्‍मा सावंत, रोहिणी गावडे, संजय पडते यांच्यासह अधिकारी खातेप्रमुख उपस्थित होते. 

मान्यवरांना निमंत्रऩावरून चर्चा 
सभेच्या सुरुवातीलाच राज्यस्तरीय कृषी पशु पक्षी प्रदर्शनाचे ठिकाण व कार्यक्रमाला कोणत्या मान्यवरांना निमंत्रित करावे यावर चर्चा करण्यात आली. व्यासपीठावरन उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी प्रदर्शनाच्या ठिकाणाबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, "पूर्वी हे प्रदर्शन कुडाळ डेपो येथे घेण्याचे निश्‍चित केले होते; मात्र महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याने वाहनतळाची समस्या निर्माण होणार आहे. त्यामुळे हे प्रदर्शन कुडाळ येथून साडेचार किलोमीटर अंतरावर परंतु महामार्गाच्या लगत असलेल्या तेर्सेबाबंडे येथे घेतले जाणार आहे.'' यावर विरोधी गटातील संजय पडते, नागेंद्र परब व अमरसेन सावंत यांनी याठिकाणाला कडाडून विरोध केला. हे प्रदर्शन कुडाळ तहसील कार्यालयाच्या नजीक घ्यावे. हे सर्वांच्या दृष्टीने चांगले ठिकाण आहे.

हेहा वाचा- बेळगावात मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याची तयारी.... -

प्रदर्शन 6 ते 9 या दरम्यान होणार
 प्रदर्शनात खुप गर्दी पण होईल. चांगला प्रतिसाद मिळेल असे सांगितले; मात्र म्हापसेकर व रणजित देसाई यांनी तेर्सेबाबंर्डे येथे जागा निश्‍चित झाली आहे. तेथील ग्रामपंचायत व ग्रामस्थांना विश्‍वासात घेतले आहे. त्यामुळे जागेत बदल होणार नसल्याचे सांगितले. त्यानंतर विरोधी पक्षाने देखील याला संमती दिली. प्रदर्शन 6 ते 9 या दरम्यान होणार आहे. यावेळी अचानक एखादा निर्णय घ्यायचा झाल्यास तो अधिकार जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा कृषि पशू सभापती राजेंद्र म्हापसेकर यांना द्यावा अशी सूचना रणजित देसाई मांडताच विरोधी गटातील सदस्यांनी कडाडून विरोध केला. निर्णय घेणे हा सर्वसाधारण सभेचा अथवा समितीचा अधिकार आहे. असा कुण्या एकट्याला अधिकार देता येणार नसल्याचे नागेंद्र परब व संजय पडते यांनी सभागृहात ठासून सांगितले.
 
प्रदर्शनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रित करावे....

यावेळी देसाई यांनी जिल्हा नियोजन समितीचा संदर्भ दिला. आम्ही पालकमंत्री यांनाही काही अधिकार देतो. त्यामुळे आपण अडवणुकीची भाषा करू नये, असे सांगितले. काही केल्या विरोधी पक्ष शांत होईना. अखेर दादा कुबल यांनी याविषयी आपले मत मांडले. दादा हे ज्येष्ठ सदस्य असल्याने त्यांची सूचना आम्ही मानतो असे नागेंद्र परब यांनी सांगून अधिकार उपाध्यक्ष यांना देण्याचे मान्य केले. गटनेते परब यांनी प्रदर्शनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रित करावे, अशी सूचना केली. अवकाळी पावसामुळे जास्तीत जास्त नुकसान कसे टाळता येईल, याबाबत येथील शेतकऱ्यांना मार्गदर्शन ठरणारी चर्चासत्र आयोजित करावी अशी मागणी केली. माजी उपाध्यक्ष देसाई यांनी राजशिष्टाचार प्रमाणे प्रदर्शनाला मान्यवरांना आमंत्रित करावे असे संगितले. 
हेही वाचा- खानापूर शहरातील कोटींच्या सरकारी जमिनी कोणी हडपल्या ? -

देसाई-खोबरेकर यांच्यात बाचाबाची 
सभागृहात माजी उपाध्यक्ष देसाई यांनी एका विषयासाठी जिल्हा नियोजन समितीचा संदर्भ दिला होता. या मुद्यावरून सदस्य खोबरेकर यांनी सभेच्या बाहेरील विषय काढून सदस्यांचा वेळ खर्ची खालू नये. आवश्‍यक नसलेले संदर्भ देऊन सभागृहाची वेळ वाया जात असल्याचे सांगितले. श्री. खोबरेकर यांच्या बोलण्याचा रोख आपल्यावर असल्याचे समजताच देसाई आक्रमक बनले. त्यामुळे काही काळ सभागृहात वातावरण तंग झाले होते. 

हेही वाचा- व्हिडिओ : सकाळ, सावंतवाडी पोलिस आणि आरपीडीतर्फे तरुणाईचे प्रबोधन...... -
 
सभापती पदासह सदस्यत्वाचे वाटप 

जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समिती सभापती, तालुका सभापती यांच्या निवडी झाल्यानंतर त्यांना खाते वाटप व कोणत्या समितीवर नियुक्ती होणे बाकी होते. आज जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक यांनी खातेवाटप केले. यात वित्त व बांधकाम सभापतीपदी रविंद्र ऊर्फ बाळा जठार, शिक्षण व आरोग्य सभापती सावी लोके यांची नियुक्ती करण्यात आली. समाजकल्याण समितीवर मालवण सभापती अजिंक्‍य पाताडे, पशुसंवर्धन समितीवर कणकवली सभापती दिलिप तळेकर, वेंगुर्ले सभापती तनुश्री कांबळी, स्थायी व कृषी समितीवर रणजित देसाई, जलव्यवस्थापन व स्थायी समितीवर संजना सावंत, वित्त व बांधकाम समितीवर जेरोन फर्नांडिस, आरोग्य समितीवर लॉरेन्स मान्येकर यांची निवड झाली.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP And ShivSena Members Agricultural Animals Birds Exhibition Planning In Oros Kokan Marathi News