माझ्या विजयात भाजपचा सिंहाचा वाटा - अनंत गीते

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जानेवारी 2017

कपाळी राजयोग हवा
कपाळी लिहिला असेल तर राजयोग येतोच. सर्वसामान्य कुटुंबातील अनंत गीते निसटत्या मतांनी निवडून आले. शिवसेनेचे १८ मातब्बर खासदार असताना केंद्रातील एकमेव मंत्रिपद राजयोगामुळेच मला मिळाले.  आगामी निवडणुकीत ज्यांच्या कपाळी राजयोग लिहिला असेल ते निवडून येतील, असे गीते यांनी सांगितले.

गुहागर - युतीमध्ये सर्वांचे हित आहे. गुहागरमध्ये युती झाली तर आम्हाला पराभूत करण्याची ताकद कोणाच्यातही नाही. माझ्या विजयामध्ये भाजपचा सिंहाचा वाटा होता. परंतु त्यानंतर जे घडले ते दुर्दैवी आहे, असे प्रतिपादन केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी केले. 

चिखलीतील शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. गीते म्हणाले की, मेळाव्यांमधून कार्यकर्त्यांचे मनोबल वाढते. पक्षाची शक्ती निवडणुकीत दिसून येते. निवडणूक मतांच्या संख्येवर जिंकावी लागते. भावनेवर नाही. निवडणुका जिंकण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज व्हावे. गुहागरातील ७ वर्षांचा वनवास संपविण्याची ताकद युतीमध्ये आहे. जनतेच्या भावनेचा आदर करून युती व्हावी. युतीचे अधिकार उद्धव ठाकरेंकडे आहेत. युती झाली तर एकदिलाने बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणून काम करा. युती न झाल्यास सर्व जागा जिंकण्याची ताकद शिवसेनेत आहे. निवडणुकीत उमेदवारीची इच्छा व्यक्त करणे गैर नाही; मात्र जे उमेदवार दिले जातील त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी प्रत्येक शिवसैनिकाची आहे. युती झाल्यावर माझे ४ शिलेदार निवडून आले तरी माझ्यासारखा भाग्यवान कोणी नसेल, असेही गीतेंनी सांगितले. 

शिवसेनेच्या मेळाव्यात रामपूर जिल्हा परिषद गटातील मिरवणे, सहाणवाडी, कुंभारवाडी तसेच रामपूरमधील जितेंद्र चव्हाण, मनसेचे उपतालुकाप्रमुख मंगेश गुढेकर यांनी समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला. तसेच पडवे जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते, कुटगिरी गावच्या सरपंच व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या सौ. आंबेकर, शृंगारतळीतील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अलि महम्मद वणू, अल्ताफ मेमन शिवसेनेत प्रवेश केला. या वेळी जिल्हा संपर्कप्रमुख विजय कदम, जिल्हाप्रमुख सचिन कदम, उपजिल्हाप्रमुख शंकर कांगणे, तालुकाप्रमुख महेश नाटेकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.

Web Title: BJP considerable part of my victory