भाजप जिल्हाध्यक्षपदाचा प्रमोद जठार यांचा राजीनामा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 मार्च 2019

कणकवली - नाणार प्रकल्प रद्द केल्याच्या कारणावरून भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी आज जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली.  आज (ता. ५) सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत असलेल्या मुख्यमंत्र्यांकडे ते राजीनामा सोपविणार आहेत. पुढील भूमिका लवकरच जाहीर करू, असेही ते म्हणाले.
येथील शासकीय विश्रामगृहात श्री. जठार यांनी पत्रकार परिषद घेतली. 

कणकवली - नाणार प्रकल्प रद्द केल्याच्या कारणावरून भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी आज जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली.  आज (ता. ५) सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत असलेल्या मुख्यमंत्र्यांकडे ते राजीनामा सोपविणार आहेत. पुढील भूमिका लवकरच जाहीर करू, असेही ते म्हणाले.
येथील शासकीय विश्रामगृहात श्री. जठार यांनी पत्रकार परिषद घेतली. 

ते म्हणाले, ‘‘कोकणवासीयांनी कोकण रेल्वे, मुंबई-गोवा महामार्ग, धरण प्रकल्प आदी विकासकामांना जमिनी दिल्या. त्याचा फायदा जगाला झाला; पण कोकणात रोजगार निर्माण झाला नाही. आता नाणारच्या माध्यमातून कोकणवासीयांना थेट दीड लाख रोजगार संधी उपलब्ध झाली होती; पण प्रकल्पच रद्द झाल्याने पुढील पन्नास पिढ्यांचे नुकसान झालेय. हा प्रकल्प रद्द झाल्याचा निषेध म्हणून मी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे.’’

श्री. जठार म्हणाले, ‘‘पर्यावरणाची हानी, प्रदूषण आदी कारणांमुळे प्रकल्प रद्द झाला असता तर ते आम्ही समजू शकलो असतो; पण राजकीय भांडणामुळे हा प्रकल्प कोकणवासीयांना गमवावा लागत आहे. रिफायनरी प्रकल्पाबाबत संपूर्ण माहिती व्हावी, यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, पत्रकार आणि ग्रामस्थ यांना घेऊन रिफायनरी कंपनीने पानिपत दौरा केला. तेथील रिफायनरी दाखवली. तेव्हा कोणतेही प्रदूषण अथवा निसर्गाची हानी झाली नसल्याचे लक्षात आले; परंतु याबाबतची कोणतीही माहिती न घेता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाणार प्रकल्पाला विरोध केला, ही चुकीची भूमिका आहे. प्रबोधनकार ठाकरे यांच्या नातवाकडून ही अपेक्षा नव्हती.’’

आता जनतेमधून उठाव व्हावा
जर समुद्रात बुडालेला एन्‍रॉन प्रकल्प पुन्हा उभा राहत असेल तर नाणार रिफायनरी प्रकल्पही सुरू होऊ शकतो. त्यासाठी आता जनतेमधूनच उठाव व्हायला हवा. इथल्या तरुणांनी त्यासाठी पेटून उठावे, असे आवाहन श्री. जठार यांनी केले.

जैतापूर प्रदूषणकारी नाही का?
रिफायनरीपेक्षा जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प कैकपटीने प्रदूषणकारी आहे. परंतु, शिवसेनेने जैतापूरला विरोध केला नाही. हा प्रकल्प काही समुद्रात बुडविला नाही. पण, विरोधासाठी विरोध करून नाणार प्रकल्प रद्द केला आहे, असे श्री. जठार म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP District President Pramod Jathar resigns