युतीच्या फॉर्म्युल्याने कोकणात भाजप घायाळ

शिवप्रसाद देसाई
बुधवार, 20 फेब्रुवारी 2019

शिवसेना-भाजप युती झाल्यामुळे कोकणातील भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. गेली निवडणूक स्वबळावर लढवल्यामुळे प्रत्येक विधानसभा मतदारसंघात भाजपचे नेतृत्व तयार झाले आणि गेली साडेचार वर्षे ते वाढवण्याचा प्रयत्न झाला; मात्र विधानसभेत बहुसंख्य जागा शिवसेनेकडे जाणार असल्याने ही खदखद निर्माण झाली आहे. 

सावंतवाडी - शिवसेना-भाजप युती झाल्यामुळे कोकणातील भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. गेली निवडणूक स्वबळावर लढवल्यामुळे प्रत्येक विधानसभा मतदारसंघात भाजपचे नेतृत्व तयार झाले आणि गेली साडेचार वर्षे ते वाढवण्याचा प्रयत्न झाला; मात्र विधानसभेत बहुसंख्य जागा शिवसेनेकडे जाणार असल्याने ही खदखद निर्माण झाली आहे. 

कोकण हा शिवसेनेचा गड मानला जातो. पूर्वी युतीच्या जागा वाटपात रायगडपासून सिंधुदुर्गापर्यंत जास्तीत जास्त जागा शिवसेनेकडे असायच्या. यामुळे भाजप ठरावीक मतदार संघ राखून होते. यात सिंधुदुर्गातील देवगड, रत्नागिरीतील गुहागर या मतदार संघांचा समावेश होता. मतदार संघ पुर्नरचनेनंतरही भाजपकडे कोकणात मर्यादीत जागा देण्याचा फॉर्म्युला कायम राहिला. 2009 मध्ये सिंधुदुर्गात भाजपने कणकवलीची जागा लढवत नारायण राणेंचा गड असलेल्या या मतदार संघात विजय मिळवला होता. असे असले तरी कोकणातील भाजपची वाढ ठरावीक मतदार संघापूरतीच मर्यादीत होती. 

2014 च्या विधान सभा निवडणूकीत युती फिस्कटली. यामुळे भाजपला काही मतदार संघात उमेदवार अक्षरशः शोधावे लागले. बऱ्याच ठिकाणी इतर पक्षातील नाराज ऐनवेळी भाजपमध्ये आले. त्यांना उमेदवारीही मिळाली.

या निवडणूकीत पनवेलमधील प्रशांत ठाकूर यांचा विजय वगळता कोकणात भाजपच्या हाती फारसे काही लागले नाही; मात्र यामुळे प्रत्येक मतदार संघात नेतृत्व निर्माण झाले. पुढे साडेचार वर्षात त्यांनी सत्तेच्या जोरावर पक्ष वाढवण्याचा प्रयत्न केला. अनेकांचे प्रवेश घेतले गेले. 2019 च्या विधान सभेत युती होणार नाही असे गृहीत धरले गेल्याने कोकणातील प्रत्येक मतदार संघात भाजपमध्ये महत्त्वाकांक्षा असलेले नेते घडत गेले. 

आता विधानसभेसाठीही युती झाली असून निम्म्या म्हणजे 144 जागा शिवसेनेला मिळणार आहेत. बालेकिल्ला असलेल्या कोकणातील जास्तीत जास्त जागा आपल्याकडे राखण्यासाठी शिवसेना दबाव टाकणार हे उघड आहे. यामुळे 2009 च्या जागा वाटपातील भाजपच्या वाट्याला आलेल्या काही जागाही शिवसेना मागण्याची भिती भाजपच्या नेत्यांना वाटत आहे. नव्याने भाजपमध्ये येवून विधानसभेच्या उमेदवारीची स्वप्न पाहणाऱ्यांसमोर तर राजकिय अंधार पसरला आहे. यामुळे भाजपमधील अस्वस्थता वाढली आहे. 

Web Title: BJP injured in Konkan due to alliance formula with Shivsena