शिवसेना - भाजपचे रत्नागिरीत मनोमिलन राहीले अधुरेच

राजेश कळंबटे
रविवार, 3 मार्च 2019

युती होण्यापुर्वी ठरलेला कार्यक्रम असून तो शिवसेनेचा वैयक्तिक आहे. त्याचे निमंत्रण भाजप पदाधिकार्‍यांना मिळालेले नाही. आमदार लाड येणार होते, परंतु प्रत्यक्षात ते कायक्रम स्थळी पोचलेले नाहीत.

- अ‍ॅड. दीपक पटवर्धन, जिल्हा प्रवक्ते, भाजप

रत्नागिरी - शिवसेनेने आयोजित केलेल्या सामुहिक विवाह सोहळ्यात भाजप पदाधिकार्‍यांना निमंत्रित करुन मनोमिलन झाल्याचा संदेश मतदारांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न आज यशस्वी झाला नाही. भाजपचे आमदार प्रसाद लाड तांत्रिक अडचणींमुळे येथे पाचू शकले नाहीत. पण स्थानिक भाजप पदाधिकार्‍यांची अनुपस्थिती जाणवत होती. निमंत्रणच न मिळाल्याचे भाजप पदाधिकार्‍यांकडून सांगितले जात असल्याने युती हवी की नको याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

खासदार विनायक राऊत यांच्या संकल्पनेतुन रत्नागिरीतील शिवसेनेने सामुहिक विवाह सोहळा आयोजित केला होता. राहुल पंडित यांनी त्याचे यशस्वी नियोजन केले होते. एकीकडे संसाराच्या आणाभाका घेत असताना युतीची घोषणा झाल्यानंतरही स्थानिक पातळीवर शिवसेना-भाजपचा संसार सुरु झाल्याचे चित्र पाहायला मिळत नाही. भाजपकडून खासदार राऊत यांच्यासह शिवसेना श्रेष्ठींच्या कार्यपध्दतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. सामुदायिक विवाह सोहळा आणि पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंच्या उपस्थितीत हा युतीचा संसार सुरु झाल्याचा संदेश द्यावयाचा होता. त्यासाठी आमदार प्रसाद लाड यांना निमंत्रित केले होते. पण म्हाडा अध्यक्ष आमदार उदय सामंत आणि आमदार लाड हे मुंबईतून एकत्र निघाले. पण हेलिकॉप्टर भरकटल्याने त्यांना कार्यक्रमस्थळी पोचता आले नाही. त्यामुळे स्थानिक पातळीवर युतीचे मनोमिलन झाल्याचा देखावा करण्याची संधी साधता आली नाही.

प्रदेशवरुन लाड यांना पाठविण्यात आले असताना स्थानिक पदाधिकार्‍यांनीही या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली होती. कार्यक्रम पत्रिकेत भाजप नेत्यांना मान दिला होता. प्रत्यक्षात एकही पदाधिकारी कार्यक्रमाकडे फिरकला नाही. 35 जोडप्यांनी अग्नीला साक्षी ठेऊन संसार सुरु केला, पण रत्नागिरीत शिवसेना-भाजप पदाधिकार्‍यांचा संसार कधी सुरु होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती.

युती होण्यापुर्वी ठरलेला कार्यक्रम असून तो शिवसेनेचा वैयक्तिक आहे. त्याचे निमंत्रण भाजप पदाधिकार्‍यांना मिळालेले नाही. आमदार लाड येणार होते, परंतु प्रत्यक्षात ते कायक्रम स्थळी पोचलेले नाहीत.

- अ‍ॅड. दीपक पटवर्धन, जिल्हा प्रवक्ते, भाजप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP leaders absent to Shivsena marriage program