वनविभाग कार्यालयावर भाजपचा मोर्चा

वनविभाग कार्यालयावर भाजपचा मोर्चा

सावंतवाडी - चौकुळसह चार वाड्यांना वीज मिळण्याच्या मागणीसाठी भाजपने आक्रमक भूमिका घेत वनविभाग कार्यालयावर ग्रामस्थांसह मोर्चा काढला. यावेळी सहाय्यक वन संरक्षक सुभाष पुराणिक यांना घेराओ घालण्यात आला. रस्त्याच्या बाजूने विद्युत विभागाचे पोल टाकण्याच्या कामास हरकत नसल्याच्या लेखी अश्‍वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

अनेक वर्षांपासूनचा असलेल्या वीजप्रश्‍नाला हिरवा कंदील मिळाला आहे. यावेळी माजी आमदार तथा भाजप सरचिटणीस राजन तेली, तालुकाध्यक्ष महेश सारंग, मनोज नाईक, अन्नपूर्णा कोरगावकर, नगरसेवक आनंद नेवगी, पंचायत समिती सदस्य संदीप गावडे, परिणीता वर्तक, धनश्री गावकर, अजय सावंत तसेच भाजप कार्यकर्ते व चौकुळ पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकुळ, चिखलवाड, धनगरवाडी व बेरडगी येथील मंजूर झालेल्या कामात वनविभागाचा अडथळा ठरत होता. याठिकाणी टाकलेले विद्युत खांब वनविभागाच्या जागेत टाकल्याच्या आरोपावरून वनविभागाने विद्युत विभागावर वनकायदा मोडल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले होते. चौकुळ, चिखलवाड, धनगरवाडी तसेच बेरडगी या वाड्यांवर अद्यापपर्यंत विजेची सोय नसल्याने भाजपाचे तालुकाध्यक्ष महेश सारंग यांनी यासाठी प्रयत्न केले. प्रत्येकाला वीज मिळावी, यासाठी पंतप्रधान ग्रामज्योती योजनेतून हे काम मंजूर करून घेतले.

त्यानुसार या परिसरात 11 केव्हीची लाईन टाकून ट्रान्सफार्मर टाकण्यात येणार होते; मात्र सुरूवातीला वनविभागाने या कामात अडथळे आणले होते. विद्युत खांब हे वनविभागाच्या हद्दीत असल्याचे कारण देत विद्युत विभागावर वनकायदा भंग करण्यात आल्याचे गुन्हे दाखल केले होते. त्यामुळे पुढचे काम विद्युत विभागाने बंद ठेवले होते. वनविभागात माजी आमदार राजन तेली यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत विद्युत विभागाने ज्या जागेतून खांब घालण्यात येणार आहेत, त्याच्या भूसंपादनाचा प्रस्ताव दिला जावा, अशी मागणी केली होती.

त्यानूसार विद्युत विभागाने प्रस्तावही वनविभागाकडे दिला होता; मात्र आता वनविभागानेच हा प्रस्ताव नाकारत असल्याचे सांगत नव्याने प्रस्ताव घेणे चुकीचे ठरेल, असे मत व्यक्त केले होते. त्यामुळे चौकुळमध्ये विज पोल उभारण्यास वेळकाढू भूमिका घेणाऱ्या वनविभागाच्या विरोधात परिसरातील धनगर बांधव व ग्रामस्थांनी भाजपाच्या मदतीने आज एल्गार पुकारला. सहाय्यक उपवनसंरक्षक सुभाष पुराणिक यांना जाब विचारला. ग्रामस्थांची आक्रमक भूमिका पाहून रस्त्याच्या बाजूने काम करण्यास आमची कोणताही हरकत नाही, असे पत्र अधिकारी पुराणिक यांनी दिल्यानंतर धनगर बांधवांनी माघार घेतली.

खाजगी मोबाईल कंपनीला परवानगी कशी मिळाली ?
यावेळी घोषणांनी उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांचे कार्यालय दणाणून सोडले. रस्त्याच्या बाजूने विज पोल घालण्यास अडचण केली जात आहे. मग एका खाजगी मोबाईल कंपनीची केबल आणण्यास परवानगी कशी काय मिळाली असा प्रश्‍न यावेळी उपस्थित करण्यात आला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com