भाजपचा शिवसेनेसोबत रत्नागिरीत अबोला सुरूच 

संदेश सप्रे
मंगळवार, 5 मार्च 2019

संगमेश्‍वर - राज्यात युती होऊनही स्थानिक पातळीवरील भाजपचे नेते युती मानायलाच तयार नाहीत. युती झाल्यावर सेनेने भाजपला गोंजारण्याचा प्रयत्न केला मात्र भाजपचा सेनेसोबतचा अबोला अजूनही सुरूच आहे. त्यामुळे का रे अबोला? का रे दुरावा? असे म्हणण्याची वेळ शिवसेनेवर आली आहे. 

संगमेश्‍वर - राज्यात युती होऊनही स्थानिक पातळीवरील भाजपचे नेते युती मानायलाच तयार नाहीत. युती झाल्यावर सेनेने भाजपला गोंजारण्याचा प्रयत्न केला मात्र भाजपचा सेनेसोबतचा अबोला अजूनही सुरूच आहे. त्यामुळे का रे अबोला? का रे दुरावा? असे म्हणण्याची वेळ शिवसेनेवर आली आहे. 

जिल्ह्यात सध्या निवडणूकपूर्व भूमिपूजनांचे पेव फुटले आहेत. जिकडे जावे तिकडे विकासकामांचे नारळ फुटताहेत. युती झाली असतानाही सर्वच ठिकाणी यजमानी आणि वऱ्हाड्यांची भूमिका सैनिकच निभावत आहेत. भाजपवाले तिकडे फिरकतही नाहीत. काही दिवसांपूर्वी रत्नागिरीत उदय सामंतांनी भाजपला बरोबर येण्याचे आवाहन केले. नुकत्याच झालेल्या सामुदायिक विवाह सोहळ्यात पक्षप्रमुखांसमोर मनोमिलनाचे डावपेच आखण्यात आले. मात्र हे सगळे हवेतले बुडबुडे ठरले. आज जिल्ह्याचे पालकमंत्री वायकर यांनी एकाच दिवसात तब्बल 66 कोटींच्या रस्ता कामांचे नारळ फोडले. त्यातही भाजपवाले कुठेच दिसले नाहीत. अखेर पालकमंत्र्यांनाच भर कार्यक्रमात यापुढे भाजपवाल्यांना सोबत घेऊन कार्यक्रम करा, असे सांगण्याची वेळ आली. संपूर्ण कार्यक्रम लक्षवेधी ठरला,पण भाजपवाल्यांची अनुपस्थितीच चर्चेचा विषय होती. 

25 वर्षे गुण्यागोविंदाने सुरू असलेला युतीचा संसार चार वर्षापूर्वी तुटला. विधानसभेतील काडीमोडानंतर दोघेही पुन्हा एकत्र येणार नाहीत,अशीच चर्चा असताना सेना सरकारमध्ये सामील झाली. निवडणुकांचा ढोल वाजल्याने पुन्हा एकत्र संसाराची चर्चा सुरू झाली. मातोश्रीवर ज्येष्ठांच्या एकाच चर्चेत काडीमोडाचा निकाल लागला आणि यापुढे एकत्र नांदायच्या आणाभाका घेण्यात आल्या. हे सर्व वरिष्ठ स्तरावर ठरले. इथे खालच्या पातळीवर गेल्या चार वर्षातील सल दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांच्या मनात अजूनही आहे. 
 
चार वर्ष एकमेकांना पाण्यात बघत 
चार वर्षात एकमेकांना पाण्यात बघत काढली. त्यामुळे आता पुन्हा त्यांच्यासोबत जायचे नाही, अशा थाटात उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांच्या अपेक्षांवर युतीने पाणी फेरले. आता झालेली युती ही केवळ शिवसेनेच्या फायद्यासाठी असल्याचे भासवत अद्यापही भाजपवाले सेनेकडे बघायला सुद्धा तयार नाहीत. वरिष्ठ नेते सांगतात एकत्र या आणि स्थानिक पातळीवर बहिष्कार असेच चित्र सध्या तरी दिसत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP Shivsena alliance situation in Ratnagiri special