संगमेश्‍वरात भाजप फुटीच्या उंबरठ्यावर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

संगमेश्‍वर - संगमेश्‍वर तालुक्‍यातील भाजपला मोठा धक्‍का बसण्याची चिन्हे आहेत. तालुका भाजपमधील मुख्य पदाधिकाऱ्याच्या एकाधिकारशाहीला कंटाळून चार जिल्हा परिषद गटांतील असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते लवकरच भाजपला रामराम करण्याच्या तयारीत आहेत. या सर्वांची एकत्रित बैठक आज झाली. लोकसभा निवडणुकांआधी संगमेश्‍वरातील भाजप फुटीच्या उंबरठ्यावर आहे.

संगमेश्‍वर तालुक्‍यातील माखजन, कडवई, कसबा आणि नावडी गटातील भाजपचे असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते तालुकास्तरीय पदाधिकाऱ्याच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत. आजच नाराज पदाधिकाऱ्यांची गुप्त बैठक देवरूखजवळ झाली. बैठकीत एकमुखाने त्या पदाधिकाऱ्याच्या कार्यपद्धतीचा निषेध करून राजीनामा देण्याचे निश्‍चित करण्यात आले.

बैठकीत झालेल्या चर्चेत लोकसभा मतदारसंघाचे पालक केवळ त्या पदाधिकाऱ्यालाच विकासकामांचा प्रसाद देत असल्याने नाराजी व्यक्‍त करण्यात आली. एक पदाधिकारी सांगेल तसे संपर्कमंत्री आणि पालक वागत असतील, तर उर्वरित कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची पक्षाला गरज नाही, हे स्पष्ट होते, असा सूर लावण्यात आला. विकासकामे करायची असतील, तर ती सर्व जि. प. गटांत सारखी केली पाहिजेत; मात्र सध्या एकाच जि. प. गटात ९० टक्‍के निधी का जातो, असा प्रश्‍न विचारला. त्या पदाधिकाऱ्याच्या एका गटातून भाजपचा खासदार आणि आमदार निवडून येणार असेल, तर उर्वरित गटांची काहीही गरज नाही.

शुक्रवारी (ता. १४) देवरूख दौऱ्यावर येणाऱ्या आमदार प्रसाद लाड यांच्यासमोर आपली कैफियत मांडून त्याच दिवशी सर्वांनी राजीनामा देण्याचे या बैठकीत ठरविले. बैठकीला जिल्हा आणि तालुकास्तरीय महिला पदाधिकारी होते. 

पक्षाच्या पालकांची भूमिका आम्हाला समजत नाही. आमच्या कामांकडे कुणीच लक्ष देत नाही. आम्ही विकासासाठी भाजपमध्ये आलो होतो, मात्र तालुकाध्यक्षांनी विकासाच्या नावावर स्वतःचे राजकारण केले. आमचा याला विरोध आहे. आम्ही राजीनामा देणार. 
- राकेश जाधव,
जिल्हा चिटणीस, भाजप

Web Title: BJP split issue in Sangameshwar