‘नाणारच्‍या चौदाशे एकर जमिनीच्या व्यवहारात मुख्यमंत्र्यांचे नातेवाईक’

राजेश कळंबट्टे | Thursday, 24 September 2020

‘नाणार प्रकल्पाचा अध्यादेश रद्द झाला. नाणार विषय संपला असे शिवसेनेचे मंत्री, खासदार, आमदार सांगत आहेत.

रत्नागिरी : नाणार रिफायनरी प्रकल्पासाठी चौदाशे एकर जमिनीचे व्यवहार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मावसभाऊ संचालक असलेल्या कंपनीमार्फत झाले आहेत, असा खळबळजनक आरोप भाजपचे प्रदेश सचिव नीलेश राणे यांनी येथे पत्रकार परिषदेत केला. शिवसेनेने या प्रकल्पाला प्रथम विरोध केला. त्यांच्याच आशीर्वादाने नाणारमध्ये परप्रांतीयांनी जमीन खरेदी केली आणि आता शिवसेनाच रिफायनरी प्रकल्प आणेल, असा दावाही त्यांनी केला.

येथील शासकीय विश्रामगृहातील पत्रकार परिषदेत ते म्हणाले, ‘नाणार प्रकल्पाचा अध्यादेश रद्द झाला. नाणार विषय संपला असे शिवसेनेचे मंत्री, खासदार, आमदार सांगत आहेत. ही स्थानिकांची दिशाभूल असून रिफायनरी कंपनीकडून मुख्यमंत्री कार्यालयाबरोबर प्रकल्पाबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहेत. ती रायगडसाठी नव्हे, तर नाणारसाठीच आहेत. रिफायनरीसाठी सुगी डेव्हलपर्स नावाच्या कंपनीने परप्रांतीयांशी भागीदारी करत जागा खरेदी केली आहे.

या कंपनीचे संचालक मुख्यमंत्री ठाकरे यांचे मावसभाऊ निशांत देशमुख हे आहेत. १४०० एकर जमिनीचे खरेदी व्यवहार १७ विविध लोकांशी केले आहेत. कोरोनातील लॉकडाउनमुळे सध्या त्यांची कार्यालये बंद आहेत. मुख्यमंत्र्यांचे नातेवाईकच नाणार जमिनीच्या व्यवहारात असतील, तर तो प्रकल्प बंद करण्याचे फक्‍त नाटक सुरू आहे. सुरवातीला विरोध दाखवायचा, लोकांना भडकावायचे आणि नंतर प्रकल्प आणायचे, हा शिवसेनेचा जुनाच उद्योग आहे.

हेही वाचा- भरपाई नाही; मग काजू विम्याचा उपयोग काय? -

बंद सातबाऱ्यावरील जमिनीची विक्री
राजापूर तालुक्‍यातील गोवळ, बारसू, सोलगाव एमआयडीसीसाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची पॉवर ऑफ एटर्नी घेऊन बंद सातबाऱ्याच्या जमिनींची विक्री केली. त्या जमिनीची विक्री करण्यास परवानगी नसते. या विषयासंदर्भात प्रांताकडे तक्रार दाखल असून त्यावर सुनावणी सुरू आहे. तक्रारीनंतरही जमिनीचे व्यवहार सुरू होते, असा आरोप नीलेश राणे यांनी केला.

संपादन - अर्चना बनगे