मोदी या नावावर किती दिवस फसवणार: राज ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 मे 2018

येत्या निवडणुकीत भाजपच्या शंभर जागा कमी होणार. गुजरातमध्ये सत्ता आणि पैसा असून काय झाले हे सर्वांना माहीत आहे. या पूर्वी देशाच्या राजकारणात मोदी व शहा यांचे नाव तरी होते का हे लोकांना समजते. त्यामूळे हे लोक पर्यायी नेतृत्व दिल्या शिवाय राहणार नाहीत, असे मत राज ठाकरे यांनी येथे व्यक्त केले.

चिपळूण : कोकणच्या किनारपट्टीला आवश्यक असलेले मत्स्य विज्ञान महाविद्यालय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरला पळवत आहेत. सर्व योजना विदर्भाला नेऊन पुन्हा फडणवीस व मुनगंटीवार स्वतंत्र विदर्भाच्या घोषणा देत आहेत. या दुटप्पीपणाचे परिणाम येत्या निवडणुकीत भोगावे लागतील. शेवटी मोदी या एकाच नावावर लोकांना किती दिवस फसवणार, अशी जहरी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली.

चिपळूण येथे आज (शनिवारी) माधव सभागृहात मनसेच्या वतीने आयोजीत कार्यक्रमाच्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते. मत्स्यवसाय तंत्रज्ञान महाविद्यालय ही किनारपट्टीच्या विकासाची गरज आहे. स्थानिक गरजा ओळखून विकासाच्या संधी देण्याचे काम राज्याच्या नेतृत्वाचे आहे. पण मुख्यमंत्री हे महाविद्यालय नागपूरला पळवून नेत आहेत, असे ते म्हणाले.

राज ठाकरे म्हणाले, ''शासनाच्या सर्व योजना विदर्भात नेऊन पुन्हा फडणवीस व मुनगुंटीवार स्वतंत्र विदर्भ झालाच पाहिजे अशा घोषणा देत असल्याच्या क्लिपींग फिरत आहेत. या संकुचित विचाराने महाराष्ट्राचे काय भले होणार याचा विचार येत्या निवडणुकीत लोक नक्कीच करतील. पालघरमध्ये भैय्ये लोकांच्या मतांसाठी भाजप नेत्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथांना बोलावले. शेवटी मोदी हे एकच नाव वापरून व खोट बोलून किती दिवस चालणार. मोदी व शहा यांना निवडणुकीपूर्वी लोक ओळखत होते का हा प्रश्‍न आहे. म्हणून आता पाहण्यांमध्ये भाजपच्या जागा शंभरने कमी होणार हे स्पष्ट पणे मांडले जात आहे. जागा वाढवण्यासाठी भाजपवाले दंगली घडवून आणतील. पण गुजरातमध्ये पैसा व सत्ता असून काय झाले हे उदाहरण समोर आहेच. पर्यायी नेतृव नाही हे म्हणणे चुकीचे आहे. मनमोहनसिंगांपासून  नरसिंहराव, देवेगौडा पंतप्रधान होतील याचा अंदाज कुणालाच नव्हता. त्यामूळे पर्यायी नेतृत्व समोर येतच असते.''

ईव्हीएम मशीनबद्दल पहिला आक्षेप आपण नोंदवला होता. शेवटी बटन दाबण्याची प्रक्रिया चुकू शकते. एका पक्षासमोरील बटन दाबल्यानंतर भाजपला मत नोंदवले जाते याचे क्लिपींग व्हायरल झाल्यावर आणखी काय पुरावे हवेत. काही वर्षापूर्वी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी ईव्हीएम मशीनबद्दल भरपुर टीका केली. सर्वोच्च न्यायालयापर्यंत भांडण गेले होते. आता तेच किरीट सोमय्या सत्ता आल्यापासून कुठे गायब आहेत असा टोला राज यांनी लगाविला.

येत्या निवडणुकीत भाजपच्या शंभर जागा कमी होणार. गुजरातमध्ये सत्ता आणि पैसा असून काय झाले हे सर्वांना माहीत आहे. या पूर्वी देशाच्या राजकारणात मोदी व शहा यांचे नाव तरी होते का हे लोकांना समजते. त्यामूळे हे लोक पर्यायी नेतृत्व दिल्या शिवाय राहणार नाहीत, असे मत राज ठाकरे यांनी येथे व्यक्त केले.

Web Title: bjp will face problem of double standards said by raj thackeray