धक्कादायक ! कोकण रेल्वे तिकीटांचा काळ्या बाजार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 डिसेंबर 2019

डेगवेकरने आयआरसीटीसी या संकेतस्थळावर स्वतःच्या युझर आयडीवरून गेल्या दोन महिन्यात काही तिकीटे ऑनलाईन बुकींग केली. ही तिकीटे प्रवाशांना तिकीटीच्या दरापेक्षा अधिक दराने विकली. संशयित आयडी आयआरसीटीच्या मुख्यालयाला आढळून आला.

कणकवली ( सिंधुदुर्ग ) - रेल्वे तिकीट वैयक्तिक युझर आयडीवर ऑनलाईन काढून त्या तिकीटांची जादा दराने प्रवाशांना विक्री केल्याच्या संशयावरून कणकवलीतील एकास आज अटक करण्यात आली. चंद्रकांत अरविंद डेगवेकर (रा.नरडवे रोड, वरचीवाडी) असे त्याचे नाव आहे. त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी - डेगवेकरने आयआरसीटीसी या संकेतस्थळावर स्वतःच्या युझर आयडीवरून गेल्या दोन महिन्यात काही तिकीटे ऑनलाईन बुकींग केली. ही तिकीटे प्रवाशांना तिकीटीच्या दरापेक्षा अधिक दराने विकली. संशयित आयडी आयआरसीटीच्या मुख्यालयाला आढळून आला. या आधारावर हा आयडी रेल्वेच्या बेलापूर येथील सुरक्षा दलाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला. याची चौकशी कोकण रेल्वेचे सिंधुदुर्ग विभागाचे पोलिस निरीक्षक अजय कुमार यांच्याकडे देण्यात आली. त्यांच्या पथकाने चौकशी दरम्यान तेलीआळीतील संशयित डेगवेकरची तपासणी केली. त्यात त्याने एकाच दिवशी 60 तिकीट बुकींग केल्याचे स्पष्ट झाले. यातील एका रद्द झालेल्या तिकीटीची रक्कमही प्रवाशांकडून घेतली. याप्रकरणी रेल्वे तिकीटाचा काळा बाजार रेल्वे कायदा 143 प्रमाणे अटक करून संशयिताला आज न्यायालयात हजर केले. या गुन्ह्याअंतर्गत दहा हजाराचा दंड आणि तीन वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. 

हेही वाचा - कोल्हापूर - मुंबई विमान सेवा या कालावधीत राहणार बंद

काळाबाजार झाल्याचे प्रथमदर्शनी उघड

तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक अरूण लोटे म्हणाले, ""एखादी व्यक्ती एका महिन्यात आपल्या कुटुंबातील लोकांसाठी केवळ 6 तिकीट ऑनलाईन बुकींग करू शकतात; मात्र रेल्वेचा काळा बाजार करणारे सातत्याने आयडी बदलून प्रमाणापेक्षा अधिक तिकीट बुकींग करतात आणि प्रवाशांकडून दामदुप्पट पैसे उकळतात. यावर नियंत्रण आणण्यासाठी आयआरसीटीसीतर्फे संशयास्पद आयडी तपासले जातात. अशा प्रकारे तपासणीत संशयित डेगवेकरचा आयडी सापडला. चौकशीत तिकीटांचा काळाबाजार झाल्याचे प्रथमदर्शनी उघड झाले आहे. अशाच प्रकारे कुडाळमध्येही कारवाई झाली आहे.'' श्री. लोटे यांच्यासह कॉस्टेबल भूषण कोचरेकर, विपूल म्हस्के आणि कोकण रेल्वेच्या संगणक तज्ज्ञांच्या पथकाने कारवाईत भाग घेतला. 

हेही वाचा - कुस्ती स्पर्धेत रेश्मा मानेस ब्राँझपदक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Black Marketing Of Konkan Railway Ticket One Arrested