esakal | सिंधुदुर्गात वैद्यकीय महाविद्यालयासाठी रक्तदान आंदोलन 
sakal

बोलून बातमी शोधा

Blood Donation Movement For Medical College In Sindhudurg

सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यात सात ठिकाणी शासकीय महाविद्यायाला तत्कालीन भाजप-शिवसेना सरकाने मंजुरी दिली; मात्र इतर जिल्ह्याच्या तुलनेत येथील शासकीय महाविद्यालयाबाबत हालचाली होताना दिसत नाही.

सिंधुदुर्गात वैद्यकीय महाविद्यालयासाठी रक्तदान आंदोलन 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग) - जिल्ह्यातील कोलमडलेली आरोग्य यंत्रणा लक्षात घेता जिल्ह्यासाठी मंजूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तातडीने व्हावे. जिल्हा रूग्णालयाची स्थिती सुधारावी, यासाठी युवा रक्तदाता संघटनेने काळ्या फिती बांधून रक्तदान आंदोलन केले. जोपर्यंत शासकीय महाविद्यालय होत नाही तोपर्यंत जिल्हाभर हे आंदोलन सुरू ठेऊ, असे संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांनी सांगितले. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यात सात ठिकाणी शासकीय महाविद्यायाला तत्कालीन भाजप-शिवसेना सरकाने मंजुरी दिली; मात्र इतर जिल्ह्याच्या तुलनेत येथील शासकीय महाविद्यालयाबाबत हालचाली होताना दिसत नाही. त्यामुळे अजुनही येथील जनतेला गोवा राज्यावर अवलंबून राहावे लागत आहे. यासाठी कृती समितीकडून ग्रामसभा, पंचायत समिती, नगरपालिका यांचे 130 ठराव, नागरिकांनी तत्कालीन मुख्यमंत्र्याना लिहिलेले 25 हजार पोस्ट कार्ड, उपोषणे तसेच मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांना आतापर्यंत प्रत्यक्ष भेटून निवेदने देण्यात आली. या जनरेट्याला देखील शासनाकडून आवश्‍यक असा तत्पर प्रतिसाद मिळाला नाही. 

सद्या कोरोना महामारीत जिल्हा आरोग्य यंत्रणा पुर्णतः कोलमडून गेली. यात योग्य उपचार न मिळाल्याने काहींना जीवही गमवावा लागला. आजही अशीच परिस्थिती आहे. एकुणच सर्व प्रकार लक्षात घेता येथील युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष सूर्याजी यांनी शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी व शासकीय महाविद्यालय उभे राहावे, यासाठी हे आंदोलन पुकारले. या आंदोलनाला अनेक रक्तदात्यांनी पाठिंबा दर्शवत रक्तदान केले. 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कृती समितीचे समन्वयक ऍड. शामराव सावंत यांनी देखील आंदोलनात सहभागी रक्तदात्याचे आभार व्यक्त केले. जोपर्यंत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन जिल्हाभर सुरूच ठेवण्यात येईल, असे सूर्याजी यांनी स्पष्ट केले. 

गौतम माठेकर, रॉक डान्टस, पार्थिल माठेकर, अभी गवस, मेहर पडते, रोहित राऊळ, अर्चित पोकळे, राघू चितारी, अनिकेत पाटणकर, दिग्विजय मुरगूड, आकाश सासोलकर, ओंकार आगोळकर, राजू कासकर, सुधिर पराडकर उपस्थित होते. या आंदोलनाला आमदार वैभव नाईक, शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे, मराठा संघटना अध्यक्ष सिताराम गावडे, कॉंग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, राष्ट्रवादी व्यापारी सेल जिल्हाध्यक्ष पुंडलीक दळवी, नगरसेवक बाबू कुडतरकर यांनी पाठिंबा दर्शविला.