दैव बलवत्तर : खोल समुद्रात नौका बुडाली ; सातजण बचावले

सकाळ वृत्तसेवा
Friday, 6 November 2020

यातील तांडेलसह सात खलाशांनी पोहत सुखरूपपणे पालशेतचा समुद्रकिनारा गाठला.

गुहागर : तालुक्‍यातील पालशेत समुद्रात किनाऱ्यापासून पाच वाव खोल समुद्रात ‘श्री सोमनाथ’ ही मच्छीमारी बोट बुडाली. यातील तांडेलसह सात खलाशांनी पोहत सुखरूपपणे पालशेतचा समुद्रकिनारा गाठला. यात त्रिशूल साखरीतील तीन खलाशांचा समावेश आहे. ही घटना बुधवारी पहाटे चारला घडली. या घटनेची नोंद गुहागर पोलिस ठाण्यात आज सकाळी करण्यात आली आहे.

हेही वाचा - प्रवीणसिंह पाटील गट रविवारी ‘राष्ट्रवादी’त करणार प्रवेश -

या बोटीवरील खलाशांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन नथुराम मुंडे, (रा. माहुल, मुंबई) यांच्या मालकीची सोमनाथ ही मच्छीमार नौका वादळामुळे दोन महिन्यांपूर्वीपासून रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड ते हर्णैदरम्यान मच्छीमारी करून जयगड बंदरात मच्छी विकायची. सोमनाथ बोटीवर तांडेलसह तीन खलाशी ओणीभाटीमधील व तीन खलाशी गुहागर तालुक्‍यातील त्रिशूल साखरी गावचे होते. त्यांची नावे तांडेल राहुल संतोष दाभोळकर (वय ३५, रा. ओणीभाटी, ता. दापोली), खलाशी अक्षय संतोष दाभोळकर (२३), समीर संतोष दाभोळकर (२६), सूर्यकांत शंकर भाटकर (५२, सर्व रा. ओणीभाटी वरवटकरवाडी), जगदीश जनन्नाथ चिवेलकर (२९, रा. त्रिशूळ साखरी, कोडबावाडी, गुहागर,) भरत लक्ष्मण भोमे (३१), हरेश शंकर पाचकुडे (३०, दोघेही रा. त्रिशूळसाखरी गुरववाडी) अशी आहेत. मंगळवारी (ता. ३) रात्री श्री सोमनाथ बोटीतील तांडेल व खलाशांनी मुंबई बंदरात जाण्याचा निर्णय घेतला. 

जयगडवरून बोट निघाली. पालशेत परिसरात पहाटे बोटीत पाणी भरू लागले. ते काढण्याचा प्रयत्न केला. बोट पालशेत बंदराकडे वळवली. बोटीत पाणी वेगाने भरू लागल्याने खलाशांनी समुद्रात उड्या मारल्या. पोहत पोहत सातही जण पालशेत बंदरात पोचले. आंबोशी बंदर आणि पालशेत जेटी यांच्यामध्ये ५ वाव समुद्रात बुडालेली बोट काढणे कठीण आहे, अशी माहिती पालशेतच्या मच्छीमारांनी दिली. 

हेही वाचा -  Success Story : युवा प्रयोगशील शेतकऱ्याने माळरानाचे केले नंदनवन; दोडकाच बनवला ब्रॅंड -

बोटमालक मुंबईतील

बोट फायबरची असून, तिचे एक टोक पाण्यावर दिसत आहे. पालशेत बंदरात ही माहिती कळल्यावर बोट काढण्यासाठी मच्छीमारांनी शर्थीचे प्रयत्न केले. पोलिसांना माहिती दिली. मत्स्यव्यवसाय विभागाचे अधिकारी देसाई यांनाही माहिती देण्यात आली. बोटीबरोबर कागदपत्र बुडाल्याने व बोट मालक मुंबईतील असल्याने पंचनामा झाला नाही. तांडेलसह सर्व खलाशी घरी गेले आहेत. बोटमालक आल्यावर पंचनामा करण्यात येईल, अशी माहिती देसाई यांनी दिली.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: boat drown in palshet sea seven people survive in ratnagiri