बोट सेवेचे तिकीट अवाक्‍यात असावे 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जानेवारी 2017

ही क्रूझ म्हणजे अरबी समुद्रातील एक तरंगता पंचतारांकित सात मजली भव्य महाल आहे. पाचशे पर्यटकांची राहण्याची सोय असलेल्या या बोटीवर सर्व सोयी सुविधा असणार आहेत. भारतीय किनारपट्टीवरील पर्यटक स्थळांचे मनोहारी दर्शन घडवीत पर्यटक बोटसेवा देश-विदेशातील पर्यटकांना भारत दर्शनाची उत्तम सोय करेल. 
- सिद्धार्थ नेवाळकर, सी ईगल व्हेंचर

मालवण - मुंबई-गोवा मार्गावर ऑक्‍टोबरमध्ये सुरू होणाऱ्या बोट सेवेचे प्रवासभाडे सर्वसामान्यांच्या अवाक्‍यात असावे, अशी अपेक्षा व्यक्त करत यासाठी आवश्‍यक सहकार्य करण्याची ग्वाही जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिली. 

मुंबई-गोवा मार्गावर येत्या ऑक्‍टोबरपासून राज लॉजिस्टीककडून बोट सेवा सुरू होत आहे; मात्र मालवण व वेंगुर्ले ही बंदरे गाळाने भरलेली आहेत. मालवण ऐवजी सर्जेकोट बंदरात तात्पुरत्या स्वरूपात बोट थांबण्याची व्यवस्था करण्याबरोबरच वेंगुर्ले बंदर गाळाने भरू नये, यासाठी मांडवी खाडीत बंधारा बांधणे आवश्‍यक असल्याचे आनंद हुले यांनी निदर्शनास आणून दिले. त्यानुसार जिल्हाधिकारी चौधरी यांनी येत्या तीस दिवसात मेरीटाईम बोर्डाचे मुख्य बंदर अधिकारी व पत्तनच्या अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. 

कोकण किनारपट्टीवर जलवाहतुकीने पर्यटन व बंदराचा व्यावसायिक विकास यावर चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी चौधरी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात 9 जानेवारीला संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. यास मेरीटाईम बोर्ड, बंदर पत्तन अधिकारी, मालवण, वेंगुर्लेचे तहसीलदार, पर्यटन विकास महामंडळाचे प्रकल्प अधिकारी यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. 

मुंबई-गोवा मार्गावर येत्या ऑक्‍टोबरपासून राज लॉंजिस्टीकत प्रवासी बोटसेवा सुरू होत आहे. राज लॉंजिस्टीकचे रझाक राजपूरकर व सी ईगल व्हेंचरच्या सिद्धार्थ नेवाळकर यांनी बंदरातील गाळ काढण्याची कार्यवाही व बंदरातील प्रवासी टर्मीनलमधील सोयीबाबत अपेक्षा व्यक्त करताना सद्यपरिस्थितीत रत्नागिरी, विजयदुर्ग, देवगड बंदरात कॅंटमरान प्रवासी बोटसेवा थांबू शकते तेथे बोटीचा जलमार्ग आखणे आवश्‍यक आहे. पण मालवण, वेंगुर्ला ही बंदरे गाळाने भरलेली आहेत. खडकांमुळे मच्छीमारी नौका फुटल्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे या बंदरात कॅंटमरान प्रवासी बोट आणण्यासाठी बंदरातील गाळ काढणे व खडक फोडणे ही कामे प्राधान्याने होणे आवश्‍यक आहेत. मालवणऐवजी सर्जेकोट मच्छीमार बंदरात तात्पुरती सोय करणे व वेंगुर्ले बंदर गाळाने भरू नये म्हणून मांडवी खाडीत बंधारा घालणे आवश्‍यक आहे, असे श्री. हुले यांनी या वेळी सांगितले. याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी मेरीटाईम बोर्डाचे मुख्य बंदर अधिकारी, पत्तन अधिकारी यांना येत्या तीस दिवसात अहवाल सादर करावा अशा सूचना दिल्या. 

कॅप्टन श्री. धोंड यांच्या सी ईगल व्हेंचर या कंपनीतर्फे क्रूझ बोटसेवा सुरू होत आहे. 

नेरुरपार पुलाखालील सळ्या काढण्याचे आदेश 
कर्ली खाडीत वालावलपर्यंत जलवाहतूक शक्‍य आहे. तसेच नेरूरपारच्या पुलाखालील लोखंडी सळ्या काढण्याची विनंती श्री. नेवाळकर यांनी केली. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी येत्या पंधरा दिवसात लोखंडी सळ्या काढण्याची सूचना पत्तन खात्यास केली. 

Web Title: Boat service ticket