पर्यटनाला नौकानयनाचा आयाम

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

राजापूर - निसर्गसौंदर्य आणि जलसाठ्याचा सदुपयोग करीत तालुक्‍यातील कशेळी येथे नौकानयन सफर पर्यटकांना आकर्षित करत आहे. या निमित्ताने स्थानिक पर्यटनाला नवा आयाम मिळाला आहे.

राजापूर - निसर्गसौंदर्य आणि जलसाठ्याचा सदुपयोग करीत तालुक्‍यातील कशेळी येथे नौकानयन सफर पर्यटकांना आकर्षित करत आहे. या निमित्ताने स्थानिक पर्यटनाला नवा आयाम मिळाला आहे.

दोन उंच डोंगरात वसलेल्या आणि सागरी महामार्गावरील कशेळी बांध येथील जलसाठ्यामध्ये नौकानयन करताना सूर्योदय आणि सूर्यास्ताचे दृश्‍य अनुभवण्याची पर्वणी पर्यटकांना मिळते. त्याचवेळी देशी-परदेशी प्रजातींच्या पक्ष्यांचे वास्तव्य, किलबिलाट आणि हवेतील कसरती अनुभवता येतात.

कशेळी बांध येथे जलसाठ्याचा उपयोग करून नौकानयन सुरू करावे, असा विचार आला. नौकानयन गणेशोत्सवापासून सुरू केले. पर्यटकांकडून प्रतिसादही मिळू लागला आहे. कोल्हापूर, मुंबई, पुणे आदी भागांतून पर्यटक येत आहे.
- सुधाकर ठाकरे

पर्यटनाला चालना मिळाल्याने स्थानिकांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध झाल्या आहेत. कशेळीमध्ये प्रसिद्ध तीर्थक्षेत्र कनकादित्य सूर्यमंदिरासह पर्यटकांच्या पसंतीला येईल असा विहंगम खाडी वा समुद्रकिनाराही लाभला आहे. रत्नागिरीकडून गोव्याकडे जाणाऱ्या महामार्गावरील कशेळी बांध येथील दोन डोंगराच्या मधोमध खाडीकिनारा आणि त्यातील जलसाठ्याचा उत्कृष्ट उपयोग करून सुधाकर ठाकरे यांनी नौकानयन सुरू केले आहे.स्वतःलाही नौकानयन करण्याची संधी येथे मिळते. नौकानयन अनुभवल्यानंतर या परिसरातील तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी भेटी देताना वेत्ये बिचसह निसर्गसफर करण्याची संधीही पर्यटकांना मिळत आहे. कशेळी येथील नौकानयन आणि पर्यटनस्थळ प्री-वेडिंग फोटोग्राफीलाही पसंती मिळाली आहे.

कशेळी येथे कोकणच्या पर्यटनाला चालना देणारा नौकायनसारखा राबविण्यात आलेला उपक्रम निश्‍चितच कौतुकास्पद आहे. अशा उपक्रमांमधून रोजगाराच्या संधीही उपलब्ध होणार आहेत. पर्यटन भविष्यातील व्यवसायाला स्थिरता देण्यास उपयुक्त ठरेल.
- धनंजय मराठे,
पक्षीमित्र

 

Web Title: Boat Touring New Scope for Konkan