तीन दिवसांपासुन मुंबई, हर्णै, गुजरातमधील नौका बंदरातच उभ्या

सकाळ वृत्तसेवा | Friday, 16 October 2020

परिणामी खोल समुद्रातील मासेमारी पूर्णतः ठप्प झाली आहे.

रत्नागिरी : चक्रीवादळ आणि मुसळधार पावसामुळे समुद्र खवळला असून, मच्छीमारी पूर्णतः ठप्प झाली आहे. गेले तीन दिवस शंभर टक्‍के नौका बंदरातच उभ्या आहेत. अचानक निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे मुंबई, हर्णैसह गुजरातमधील शेकडो नौका रत्नागिरी तालुक्‍यातील जयगड, लावगण किनाऱ्यांवर आश्रयासाठी आलेल्या आहेत.

शनिवारपासून कोकण किनारपट्टीवर वेगवान वारे वाहत आहे. जोडीला मुसळधार पाऊस असल्यामुळे समुद्रही खवळलेला आहे. परिणामी खोल समुद्रातील मासेमारी पूर्णतः ठप्प झाली आहे. हलका वारा असल्यामुळे फिशिंग, गिलनेटद्वारे मासेमारी करणाऱ्या नौकांनी शनिवारपासून बंदरात उभे राहणे पसंत केले तर काही पर्ससीन, ट्रॉलिंगवाले दहा ते बारा वावात मासेमारी करत होते.

हेही वाचा - अमेरिकेचा पाहुणा आला रत्नागिरीत भरकटत -

मंगळवारनंतर वातावरणात बदल झाले आणि वाऱ्याचा वेग वाढला. समुद्र खवळल्याने पाण्यालाही प्रचंड करंट होता. अजस्त्र लाटा वाहत असल्यामुळे मच्छीमारांमध्ये धडकी भरलेली होती. हर्णैतील शेकडो नौका आंजर्ले खाडीत आश्रयाला दाखल झाल्या. काही नौका दिघी आणि जयगड बंदरात उभ्या केल्या आहेत. त्याचबरोबर मुंबईसह गुजरातमधील शंभरहून अधिक नौकांनी जयगड, लावगण बंदराजवळ आश्रय घेतला आहे. अजून दोन वातावरण जैसे थे राहणार असल्यामुळे या नौका अजून काही काळ येथेच राहतील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. यंदा बंपर मासळी मिळत नसली तरीही काही नौकांच्या जाळ्यात बऱ्यापैकी मासा लागत आहे. गेले तीन दिवस शेकडो नौका बंदरातच उभ्या आहेत.

"वातावरण बदलाचा परिणाम मच्छीमारीवर होतो. ‘निसर्ग’ वादळानंतर मच्छीमारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे या परिस्थितीत मासेमारीसाठी कोणीच बाहेर पडत नाही."

- अभय लाकडे, मच्छीमार

हेही वाचा -  कर्ज देण्याच्या बहाण्याने तरूणाला लाखाचा गंडा 

 

संपादन - स्नेहल कदम