प्रयोगशाळा परिचर पदाच्या परीक्षेसाठी तोतया उमेदवार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 ऑक्टोबर 2016

दाभोळ - दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठात क व ड गटाच्या परीक्षेवेळी दुसऱ्याच्या नावावर परीक्षेला बसलेल्या व इलेक्‍ट्रॉनिक साधनांचा वापर करून परीक्षा देणाऱ्या औरंगाबाद येथील एका तोतयाला पोलिसांच्या हवाली करण्यात आले. पोलिस ठाण्यात तोतया व मूळ उमेदवाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तोतयाला गुरुवार (ता. 27) पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

दापोली पोलिसांनी सांगितले, की कोकण कृषी विद्यापीठात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी लेखी परीक्षाही घेतली जात आहे. शनिवारी (ता. 22) प्रयोगशाळा परिचर पदासाठी सकाळी 11 वाजता परीक्षा होती. परीक्षा सुरू असताना एक उमेदवार इलेक्‍ट्रॉनिक साधनांचा उपयोग करून कॉपी करीत असल्याचे पर्यवेक्षक शेखर मेहेंदळे यांच्या लक्षात आले. त्यांनी या उमेदवाराची तपासणी केली असता त्याच्याकडे इलेक्‍ट्रॉनिक उपकरणे आढळली. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे किशोर विनायक घुगे (रा. औरंगाबाद) या परीक्षार्थींच्या नावाचे तयार केलेले बनावट आधार कार्ड आढळून आले. तोतया उमेदवाराचे नाव अविनाश बाळू राठोड असे असून तो औरंगाबाद येथील आहे. त्याला पोलिसांच्या हवाली करण्यात आले. पर्यवेक्षक मेहेंदळे यांनी त्याच्याविरोधात पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्या नुसार अविनाश राठोडविरोधात गुन्हा दाखल झाला. त्याला अटक झाली. न्यायालयाने त्याला 27 ऑक्‍टोबरपर्यत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

वर्ग चारच्या पदांच्या भरती प्रक्रियेत कोकणातल्या उमेदवारांना संधी मिळत नसताना आता तोतया उमेदवार परीक्षेला बसू लागल्याने दापोलीत खळबळ उडाली आहे. पोलिस उपनिरीक्षक सागर पवार तपास करीत आहेत.

Web Title: Bogud candidate found for Laboratory assistant exam