'त्या' बाँबचे लक्ष्य होते अलिबागमधील पर्यटक 

bomb
bomb

पनवेल : आपटा (ता. पनवेल) येथे एसटी बसमध्ये सापडलेल्या जिवंत बॉंबचे लक्ष्य अलिबागमधील पर्यटक असल्याचे रायगड पोलिसांच्या तपासात उघड झाले. एका एसटी कर्मचाऱ्याच्या नजरचुकीमुळे तो बॉंब बसमध्ये गेला. वस्तुतः अलिबागमधील पर्यटकांच्या गर्दीत स्फोट घडवण्याचा कट होता. तपासातून समोर आलेल्या या माहितीमुळे अलिबागसारखी पर्यटनस्थळेही दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

कर्जत-आपटा या एसटी बसमध्ये सापडलेला तो बॉंब मुळात अलिबाग एसटी आगारातून सुटलेल्या अलिबाग-कर्जत या गाडीत होता. बुधवारी (ता. 20) सायंकाळी पावणेसहाला ती बस निघाली. गजानन जारंडे हे चालक, तर पुजाराम मेंडके वाहक होते. कर्जतला ठरलेल्या वेळेपेक्षा उशिरा, म्हणजे रात्री पावणेनऊला ही बस पोचली. तेथे मेंडके आणि जारंडे यांची कर्जत-आपटा बसवर ड्यूटी लावली होती. जारंडे यांना एक पिशवी दिसली. मेंडके यांच्याच साहित्याची पिशवी असल्याचे समजून त्यांनी ती उचलली आणि कर्जत-आपटा बसमध्ये ठेवली, अशी माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे. 

बॉंबची पिशवी अलिबाग-कर्जत बसमध्ये कोणी ठेवली, याचा उलगडा मात्र अद्याप होऊ शकलेला नाही. तूर्तास या तपासाचे धागेदोरे अलिबाग येथील गर्दीच्या बस आगारापर्यंत येऊन थांबले आहेत. त्यामुळे पर्यटनस्थळांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. 

बस आगारांना सावधानतेचा इशारा 
अलिबागसह जिल्ह्यातील सर्व बस आगारांना पोलिसांनी सावधानतेचा इशारा दिला आहे. तपासासाठी आठ पथके स्थापन करण्यात आली आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. पोलिसांचा जनतेशी खुंटलेला संवाद आणि खबऱ्यांचे कमकुवत झालेले जाळे हा या तपास मोहिमेत मोठा अडथळा ठरत आहे. पोलिसांचा तपास सध्या मोबाईल फोनचे सर्व्हर आणि सीसीटीव्ही कॅमेरे अशा तांत्रिक बाबींवरच अवलंबून असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com