पहिल्याच दिवशी मिळणार पुस्तके

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 मे 2017

रत्नागिरी - नव्या शैक्षणिक वर्षांसाठी जिल्हा परिषद शिक्षण विभाग सज्ज झाला आहे. पहिली ते आठवीतील विद्यार्थांना पहिल्याच दिवशी पुस्तके मिळावी यासाठी तयार पूर्ण झाली आहे. विद्यार्थ्यांसाठी ७ लाख ७८ हजार १६० पुस्तके तालुकास्तरावर प्राप्त झालेली आहेत.

रत्नागिरी - नव्या शैक्षणिक वर्षांसाठी जिल्हा परिषद शिक्षण विभाग सज्ज झाला आहे. पहिली ते आठवीतील विद्यार्थांना पहिल्याच दिवशी पुस्तके मिळावी यासाठी तयार पूर्ण झाली आहे. विद्यार्थ्यांसाठी ७ लाख ७८ हजार १६० पुस्तके तालुकास्तरावर प्राप्त झालेली आहेत.

मोफत शिक्षण कायद्याअंतर्गत विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियानातून मोफत पुस्तके दिली जातात. त्यानुसार सर्व शिक्षा अभियानाच्या जिल्हा कार्यालयातर्फे २०१६-१७ या वर्षांकरिता ऑनलाइन पुस्तकांची मागणी केली होती. त्यानुसार पुस्तकांचा साठा १५ मेपूर्वीच तालुकास्तरावर उपलब्ध झाला आहे. मोफत पाठ्यपुस्तक वाटपाचा विषय नेहमीच चर्चेचा मुद्दा ठरतो. मोफत पाठ्यपुस्तक उचलण्याचे ओझे गुरुजींना उचलावे लागत असल्याने नाराजी व्यक्त केली जात होती. दोन वर्षांपूर्वी शाळा सुरू होऊनही विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध न झाल्याने या योजनेचा पुरता बोजवारा उडाला होता. यावर्षी मात्र शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्याना पुस्तके मिळणार आहेत. 

एकही विद्यार्थी पुस्तकापासून वंचित राहणार नाही, याची काळजी शिक्षण विभागाने घेतली आहे. यावर्षीपासून विद्यार्थ्यांना गणवेशाऐवजी गणवेशाची रक्कम देण्यात येणार आहे. गणवेशाची चारशे रुपये इतकी रक्कम थेट बॅंक खात्यात जमा करण्यात येणार आहे. विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांच्या पालकांच्या नावे बॅंकेत संयुक्त खाते उघडून या खात्यात गणवेशाची रक्कम जमा करण्यात येणार आहे. संयुक्त बॅंक खात्यातच हे पैसे जमा होणार आहेत. यापूर्वी शाळा व्यवस्थापन समितीमार्फत शालेय गणवेशाचे वाटप होत होते. या प्रक्रियेबाबत तक्रारी वाढल्याने गणवेशाची रक्कम थेट खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला.

 तालुकानिहाय पुस्तकांची आकडेवारी अशी ः 
* मंडणगड     ३४ हजार ६३६
* दापोली      ८३ हजार ०९०
* खेड          ७८ हजार ८१८
* चिपळूण    १ लाख ३१ हजार २५७
* गुहागर        ६१ हजार ११४
* संगमेश्वर      ९३ हजार ९८५
* रत्नागिरी   १ लाख ५४ हजार ४५६
* लांजा         ५२ हजार २७९
* राजापूर       ८६ हजार ५२५

Web Title: Books will be available on the first day