बेकायदा दारू वाहतुकीला विशेष पथकाचा चाप

राजेश शेळके : सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016

"राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांचे नुकतेच पत्र प्राप्त झाले आहे. त्या अनुषंगाने बेकायदेशीर मद्यविक्री आणि वाहतुकीला पायबंद घालण्यासाठी विभागीय स्तरावर विशेष पथकाची स्थापना केली आहे.''
- संतोष झगडे, अधीक्षक
राज्य उत्पादन शुल्क, रत्नागिरी

रत्नागिरी : बेकायदेशीर दारू वाहतुकीला चाप लावण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने राज्यभर विशेष पथक स्थापन केली आहेत. या विभागाच्या आयुक्तांच्या सूचनेनुसार कोल्हापूर विभागात दहाजणांचे पथक कारवाईसाठी सज्ज आहे. अशा दारू वाहतुकीमुळे राज्याचा कोट्यवधीचा महसुल बुडत आहे. त्या पायबंद घालण्यासाठी अशा प्रकारची पथके नियुक्त करण्यात आली आहेत.

राज्यात मूल्याधारित अबकारी करप्रणाली सुरू आहे. उत्पादन शुल्क कर इतर राज्याच्या तुलनेत जास्त असल्याने मद्यांची किमतही अधिक आहे. इतर राज्यात कर कमी असल्याने मद्य तुलनेत स्वस्त आहे. त्यामुळे सीमेवरील गोवा, कर्नाटक, तेलंगणा, छत्तीसगड, मध्यप्रदेश आदी राज्यातून मद्य आणि मद्यार्कही राज्यात येतो. मद्यार्क गोव्यात जातो. तेथे त्याची दारू होऊन पुन्हा राज्यातच विक्रीला येत असल्याचे उघड आहे. या बनावट मद्यनिर्मितीच्या व्यवसायावर अंकुश ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. हा व्यवसाय करणाऱ्यांची राज्यभरात मोठी साखळी आहे. त्यावर नियंत्रण ठेवणे शक्‍य झालेले नाही. यामुळे शासनाचा महसूलदेखील मोठ्या प्रमाणात बुडत आहे. शासनाचे नुकसान टाळून, अशा व्यक्तींवर कारवाई करून या विभागाची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय स्तरावर कारवाई करण्यासाठी विशेष पथकांची नेमणूक होणार आहे.

मूळ कार्यभार सांभाळून त्यांच्यावर ही जबाबदारी टाकण्यात आली आहे; परंतु त्यासाठी त्यांना विशेष अधिकार आणि प्रवास, इंधन खर्च आस्थापनेवर निघणार आहे. त्यांनी केलेल्या कारवाईचा अहवाल थेट आयुक्तांना देण्यात येणार आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संतोष झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली गडहिंग्लज, रत्नागिरी, कागल, हातकणंगले, शाहूवाडी असे अधीक्षक, चार निरीक्षक, चार जवान, असे दहाजणांचे पथक तयार केले आहे. कालच आयुक्तांचे पत्र या विभागाला प्राप्त झाले आहे.

Web Title: break on illegal liquor transport