तानसा नदीवरील पुलाला भगदाड 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

- वाडा भिवंडी महामार्गावरील तानसा नदीवरील डाकिवली येथे गेल्या चार पाच वर्षापूर्वी बांधलेल्या पुलाला भले मोठे भगदाड पडले आहे.

- त्यामुळे सुप्रीम कंपनीने गेले चार दिवस खड्डे दुरूस्तीच्या नावाखाली पुलावरून वाहतूक बंद केली होती. भगदाडावर प्लाय आणि प्लॅस्टीकचे आवरण देऊन याबाबत अतिशय गुतप्ता राखली होती.

- मात्र  झाकून ठेवलेले भगदाड उघडे करून सुप्रीम कंपनीच्या निकृष्ठ कामाचा आणखी एक नमुना चव्हाट्यावर आला आहे

वाडा : वाडा भिवंडी महामार्गावरील तानसा नदीवरील डाकिवली येथे गेल्या चार पाच वर्षापूर्वी बांधलेल्या पुलाला भले मोठे भगदाड पडले आहे. त्यामुळे सुप्रीम कंपनीने गेले चार दिवस खड्डे दुरूस्तीच्या नावाखाली पुलावरून वाहतूक बंद केली होती. भगदाडावर प्लाय आणि प्लॅस्टीकचे आवरण देऊन याबाबत अतिशय गुतप्ता राखली होती. मात्र  झाकून ठेवलेले भगदाड उघडे करून सुप्रीम कंपनीच्या निकृष्ठ कामाचा आणखी एक नमुना चव्हाट्यावर आला आहे

वाडा भिवंडी मनोर या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम बांधा वापरा व हस्तांतरीत करा या तत्वावर शासनाने सुप्रीम कंपनीला गेल्या पाच वर्षापूर्वी दिले आहे. या रस्त्यांच्या कामाचा कालावधी दोन वर्षाचा होता. मात्र पाच वर्षं होऊनही या रस्त्याचे काम पूर्ण होऊ शकलेले नाही.

वनविभागातील सोळा किलोमीटर अंतराचा रस्ता अद्यापही दुपदरीच आहे. तसेच पिंजाळ आणि देहर्जे या नद्यांवरील पुलांची कामे अपूर्ण अवस्थेत आहेत. तसेच वाडा ते भिवंडी दरम्यानच्या रस्ता हा अतिशय निकृष्ठ दर्जाचे झाल्याने या रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य आहे. खड्डे पडल्यानंतर तात्पुरती डागडुजी केली जाते. मात्र नंतर रस्ता पुन्हा तसाच. या रस्त्यासाठी अनेक सामाजिक संघटना, राजकीय पक्ष यांनी अनेक वेळा आंदोलन करुनही निगरगठ्ठ प्रशासन व कामाचा ठेका असलेली कंपनी दुर्लक्ष करत आहेत.

सुप्रीम कंपनीच्या निकृष्ठ व अपूर्ण कामामुळे आत्तापर्यंत शेकडो नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर हजारो जायबंदी झाले आहेत. त्यामुळे येथील नागरिकांत संतापाने वातावरण पसरले आहे. यासंदर्भात सुप्रीम कंपनीचे अधिकारी झेड एन शेख आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता चंद्रकांत पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. 

वैतरणा नदीवरील गांध्रे येथे पुल बांधण्यात आला असून या पुलाचे उद्घाटन करण्याआधीच या पुलाला भगदाड पडले होते. सुप्रीम ने केलेल्या निकृष्ठ कामाचे त्यामुळे वाभाडे निघाले होते. आता तानसा पुलाला भगदाड पडल्याने सुप्रीम चा कारभार चव्हाट्यावर आला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The bridge over the Tansa River damaged