"बीएस-3'मुळे दुचाकींचा बंपर सेल 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 एप्रिल 2017

कणकवली - "बीएस थ्री' मानकामुळे वाहन कंपन्यांनी कमी केलेल्या वाहनांच्या किमतीमुळे दुचाकी खरेदीसाठी आज सकाळपासून ग्राहकांची झुंबड उडाली, मात्र या गाड्यांचा स्टॉक मर्यादित असल्याने शोरूम उघडल्यानंतर अवघ्या दोन तासातच सर्व गाड्या विक्री पूर्ण झाली. यामुळे अनेक ग्राहकांच्या पदरी निराशा पडली. 

कणकवली - "बीएस थ्री' मानकामुळे वाहन कंपन्यांनी कमी केलेल्या वाहनांच्या किमतीमुळे दुचाकी खरेदीसाठी आज सकाळपासून ग्राहकांची झुंबड उडाली, मात्र या गाड्यांचा स्टॉक मर्यादित असल्याने शोरूम उघडल्यानंतर अवघ्या दोन तासातच सर्व गाड्या विक्री पूर्ण झाली. यामुळे अनेक ग्राहकांच्या पदरी निराशा पडली. 

उद्या (ता. 1) पासून "बीएस थ्री' गाड्यांच्या विक्रीला व नोंदणीला सुप्रीम कोर्टाने बंदी घातल्यानंतर या गाड्यांच्या विक्रीचा बंपर सेल आज विक्रेत्यांनी सुरू केला. याबाबतची इत्थंभूत माहिती कालपासूनच सोशल मीडिया आणि दूरचित्रवाहिन्यांवरून दिली जात होती. त्यामुळे अनेक ग्राहकांची आज सकाळपासून रोख रक्‍कम घेऊन कणकवली आणि जानवली येथील होंडा, हिरो मोटो कॉर्प आणि टीव्हीएस या दुचाकींच्या शोरूमसमोर गर्दी केली होती. 

या कंपन्यांनी सहा हजारांपासून तब्बल 25 हजारांपर्यंत सवलत देऊन दुचाकींचा बंपर सेल जाहीर केला होता. यात हिरो मोटो कॉर्प, होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया, बजाज ऑटो, सुझुकी मोटारसायकल या कंपन्यांच्या वाहनांचा समावेश होता. सोशल मीडियावरील या सेलचा मोठा बोलबाला झाल्याने काल (ता. 30) सायंकाळपासूनच या गाड्यांच्या खरेदीसाठी ग्राहकांचे दुचाकीच्या चौकशीसाठी शोरूममध्ये फोन घणघणत होते. 

आज सकाळी शोरूम उघडताच अवघ्या दोन तासातच स्टॉकमध्ये असलेली "बीएस-3' मॉडेलच्या वाहनांची विक्री पूर्ण झाली. कणकवली आणि जानवली येथील हिरो मोटोकॉर्प, होंडा आणि टीव्हीएस या कंपन्यांची 160 वाहने शिल्लक होती. या सर्व वाहनांची विक्री पूर्ण झाली. अनेक ग्राहकांना पैशाची जमवाजमव करेपर्यंत दुपारचे बारा वाजले. तोपर्यंत सर्व गाड्या विक्रीस गेल्या होत्या. दरम्यान, अनेक घरांमध्ये एकाच वेळी दोन ते तीन वाहनेही खरेदी झाल्याचे चित्र होते. 

डॅमेज गाड्यांची खरेदी 
वाहनांची वाहतूक व इतर कारणांमुळे स्क्रॅच पडलेल्या, काही भाग तुटलेल्या दुचाकींचीही आजच्या बंपरसेलमध्ये विक्री झाली. आजवर ही वाहने ग्राहकांनी नाकारली होती, मात्र बंपर सेलमध्ये भरघोस सूट मिळत असल्याने अडगळीत पडलेली ही वाहने देखील विक्रीला गेली. 

Web Title: BS-III Bumper cell of wheeler