मांडवी किनारी सापडलेल्या ‘बुबी‘ला जीवदान

राजेश शेळके
बुधवार, 27 जून 2018

‘‘कोकणात निळ्या पायाचा बुबी पक्षी आढळतो. त्याला सी बर्ड असे म्हणतात. समुद्रातील माशांची शिकार हेच त्यांचे अन्न. मांडवीत सापडलेला बुबी जखमी नव्हता. मात्र त्याला पिसवांचा प्रादुर्भाव झाला होता. त्याच्यावर उपचार केल्यानंतर बुबीला सोडून दिले.’’
- अनिकेत वाडेकर, पक्षी मित्र, रत्नागिरी

रत्नागिरी : समुद्रातील मासे हेरून आकाशातून थेट पाण्यात सूर मारत भक्ष पकडणार्‍या निळ्या बुबी पक्षाला मंगळवारी (ता. 26) मांडवीतील काही जागृत तरुणांनी आणि पक्षी मित्रांनी जीवदान दिले. कोकणात जरी ही प्रजाती असली तरी ती दुर्मिळ होऊ लागली आहे. बुबी अतिशय देखणा आहे. पक्षी मित्रांनी केलेल्या उपचारानंतर सायंकाळी त्याने आकाशात मुक्त विहार केला. 

शहरातील मांडवी येथील हॉटेल व्यवसायिक आणि पक्षी, प्राण्यांचा निस्सिम छंद असलेल्या कपिल सुर्वे यांना समुद्र किनारी हा अशक्त निळ्या पायाचा बुबी पक्षी आढळला. त्याला उडायला येत नसल्याने त्याचा जीव धोक्यात होता. कुत्रे त्याच्या मागे लागले होते. कपिल सुर्वे यांनी बुबीला कुत्र्यांच्या तावडीतून सोडवले. त्यानंतर पक्षी मित्र सनिकेत वाडेकर आणि हर्षल कोसुंबकर यांना माहिती दिली. बुबीला घेऊन डॉक्टरांकडे नेले. बुबीला काही जखम नव्हती. मात्र त्याच्या अंगावर प्रचंड पिसवा होत्या. पिसवांमुळे बेजार झाल्याने भरारी घेण्यास अडचण येत होती. पक्षी मित्रांनी अंगावर पिसवांची पावडर मारल्याने बुबीने मोकळा श्‍वास घेतला. काही तासात तो सशक्त झाला आणि सायंकाळी आकाशात मुक्त विहार केला.  

‘‘कोकणात निळ्या पायाचा बुबी पक्षी आढळतो. त्याला सी बर्ड असे म्हणतात. समुद्रातील माशांची शिकार हेच त्यांचे अन्न. मांडवीत सापडलेला बुबी जखमी नव्हता. मात्र त्याला पिसवांचा प्रादुर्भाव झाला होता. त्याच्यावर उपचार केल्यानंतर बुबीला सोडून दिले.’’
- अनिकेत वाडेकर, पक्षी मित्र, रत्नागिरी

‘‘बुबी पक्षाला उडता येत नव्हते. मांडवी किनार्‍यावर कुत्रे त्याच्या मागे लागले होते. मी पाहिल्यानंतर त्यांच्या तावडीतून बुुबीला सोडवून पक्षी मित्रांच्या स्वाधीन केले. एका पक्षाला जीवदान दिल्याचे समाधान वाटले.’’ 
- कपिल सुर्वे, मांडवी, रत्नागिरी 

Web Title: bubi bird found at Mandvi river