स्कूबा डायव्हिंगला बुधल किनारा पोषक

स्कूबा डायव्हिंगला बुधल किनारा पोषक

रत्नागिरी - मिऱ्या, तारकर्लीप्रमाणे पर्यटनाला चालना मिळेल अशी जैवविविधता, रंगबीरंगी मासे आणि डॉल्फीनचा वावर गुहागर तालुक्‍यातील बुधल ते वेळणेश्‍वर दरम्यानच्या किनारी भागात आढळला आहे. या ठिकाणी स्कूबा डायव्हिंग प्रकल्प सुरू करता येऊ शकतो. त्यादृष्टीने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) अधिकाऱ्यांनी प्राथमिक पाहणी केली.

जिल्ह्यात पर्यटक स्थिर राहावेत यासाठी एमटीडीसीने दहा नवीन पर्यटनस्थळे शोधण्याची मोहीम हाती घेतली आहे. गणपती पुळे, मुरुड, गुहागरसारख्या प्रसिद्ध किनाऱ्यांव्यतिरिक्‍त पर्यटकांना वेगळे काहीतरी पाहायला मिळावे आणि ते जास्तीत-जास्त दिवस जिल्ह्यात राहावेत यासाठी हा प्रयत्न आहे. त्यात गुहागरमधील हेदवी ते अंजनवेल किनाऱ्याची पाहणी अधिकाऱ्यांनी केली.

छोटे किनारे, टेकड्या, मंदिरांसह नयनरम्य अशा खासगी जागा पर्यटन निधीतून विकसित केल्या जाणार आहेत. हा प्रस्ताव मे महिन्यापर्यंत सरकारला सादर करावयाचा आहे. यासाठी खासगी व्यावसायिकांशी सामंजस्य करार करण्याचा विचार एमटीडीसीचा आहे.

बुधल समुद्राजवळील खडकांमुळे पाणी संथ होते. त्यामुळे विविध प्रकारच्या माशांचे येथे वास्तव्य आहे. शांत पाण्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची जैवविविधताही येथे सापडू शकते. अनेक वेळा या परिसरात डॉल्फीनचाही आढळ असतो. हे पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे स्थळ होऊ शकते. हा किनारा पुढे वेळणेश्‍वरला उथळ होत जातो. या किनाऱ्यावर तारकर्लीप्रमाणे स्कूबा डायव्हिंग प्रकल्प सुरू केल्यास मोठ्या प्रमाणात पर्यटक येथे येऊ शकतात. याचा विचार करून एमटीडीसीने पावले उचलली आहेत.

खासगी व्यावसायिकाने प्रस्ताव दिल्यास मिऱ्याप्रमाणे तिथेही संयुक्‍त प्रकल्प सुरू करता येणार आहे. एमटीडीसीने पर्यटक निवासात पौर्णिमेच्या दिवशी उदयोन्मुख कलाकार, साहित्यिकांसाठी कार्यक्रम ठेवले आहेत. पुढील पौर्णिमेला गणपती पुळे येथे कार्यक्रम होणार आहे. निवास व न्याहारी, महाभ्रमण योजनांच्या प्रसिद्धीसाठी कार्यशाळांचे आयोजन केले जाणार आहे. 

तीच-तीच पर्यटनस्थळे पाहण्यापेक्षा नवीन ठिकाणे पर्यटकांपुढे ठेवली जाणार आहेत. त्यात किनारे, टेकड्या, मंदिरे किंवा नयनरम्य अशा खासगी जागांचा समावेश असेल. त्यासाठी शोधमोहीम सुरू आहे.
- जगदीश चव्हाण,
प्रादेशिक व्यवस्थापक, एमटीडीसी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com