बाबासाहेबांचे मूळ गाव आंबडवेच्या भागातील अनेक गावे अंधारात

सचिन माळी
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

मंडणगड तालुका : वादळी वाऱ्याचा फटका; ग्रामीण भागात बत्तीस तास वीज गायब; महावितरणविषयी नागरिकांमध्ये तीव्र नाराजी

मंडणगड : गेल्या चार दिवसांपासून तालुक्यात सुरू असलेल्या दिवसरात्र संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मंगळवारी सकाळी दहा वाजता झालेल्या वादळी पावसाचा तडाखा महावितरणला बसला असून वीज पुरवठा खंडित झाल्याने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मूळ गाव आंबडवेसह येथील अनेक गावे बत्तीस तासांहून अधिक काळ अंधारात होती. त्यामुळे विद्यार्थी, नागरिकांचे हाल झाले आहेत. संध्याकाळी सुटणाऱ्या वादळी वाऱ्यामुळे हवेत कमालीचा गारवा निर्माण झाला असून संततधारेमुळे नागरिकांनी घराबाहेर पडण्याचे टाळले. काही ठिकाणी वीजपुरवठा पुन्हा सुरू करण्यात आला, मात्र सर्व गावांतील वीजपुरवठा अद्याप पूर्ववत झालेला नाही.

शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात सोमवारपासून पावसामुळे वीज पुरवठा वांरवार खंडीत झाला होता. मंगळवारी खेड मंडणगड महामार्गासह, मंडणगड बाणकोट महामार्ग व आंर्तगत भागातील ग्रामीण रस्त्यांवर ठिकठीकाणी विजेच्या तांरावर झाडांच्या फांद्या पडल्याने सकाळी अकरा वाजता खंडीत झालेला विजपुरवठा बत्तीस तास उलटल्यानंतरही पूर्ववत झालेला नाही. दापोली व मंडणगड या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या चिंचघर येथील पुलावरुन भारजा नदीचे पुराचे पाणी गेल्याने परिसरातील शेती पाण्याखाली गेली आहे.

याचबरोबर या विभागातील वाहूतक बारा तासांहून अधिक काळ बंद झाली होती. ती हळू हळू पूर्वपदावर येत आहे. तिडे तळघेर या गावांना जोडणाऱ्या कुंबळे येथील कॉजवेवरुन पाणी गेल्याने या दोन गावांचा असलेला संपर्क तुटला होता. त्या ठिकाणचे पाणी ओसरले आहे. काल दिवसभरात तालुक्यात एकूण ११६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून तालुक्यात ३५७७ मि.मी. इतका पाऊस झाला आहे. वादळीवाऱ्यांनी ठिकठीकाणी पडलेली झाडे बांधकाम विभागाने तत्परतेने जागेवरुन बाजूला काढून वाहतूक पूर्ववत केली. तालुक्यांतील तुळशी, पाले, पाचरळ, घोसाळे, आंबडवे, आंबवणे, निगडी, घुमरी पंचक्रोशीतील अनेक गावे अंधारात असल्याने महावितरणच्या कारभाराविषयी लोकांमधून तीव्र स्वरुपात नाराजी व्यक्त केली जात आहे. (आंबडवे गावाचा उल्लेख आंबवडे असाही केला जातो). आपत्ती व्यवस्थापनास सज्ज असल्याचा दावा महावितरण नेहमीच करत असते मात्र मे महिन्यात करावयाची कामे व घ्यावयाची काळजी यांचा पुरेपुर विचार न करण्यात आल्याने आयत्यावेळी महावितरण कर्मचाऱ्यांना धावधाव करावी लागत आहे.

Web Title: buldhana marathi news ambedkar's ambadve

फोटो गॅलरी