कोकिसरेत बैलगाडी शर्यतीवरून वाद 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 एप्रिल 2017

वैभववाडी - कोकिसरे नारकरवाडी येथील महालक्ष्मी मित्रमंडळातर्फे आज आयोजित बैलगाडी शर्यत ऐन रंगात असताना पोलिसांनी बंद पाडली. पोलिसांनी आयोजकांना गाडीत कोंबल्यामुळे उपस्थित पदाधिकारी आणि त्यांच्यात वादावादी झाली. त्यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले. बेकायदा बैलगाडी शर्यतीचे आयोजन केल्यामुळे पोलिसांनी राजेंद्र नारकर आणि हिराचंद मुरकर या दोन आयोजकांवर गुन्हा दाखल केला आहे. 

वैभववाडी - कोकिसरे नारकरवाडी येथील महालक्ष्मी मित्रमंडळातर्फे आज आयोजित बैलगाडी शर्यत ऐन रंगात असताना पोलिसांनी बंद पाडली. पोलिसांनी आयोजकांना गाडीत कोंबल्यामुळे उपस्थित पदाधिकारी आणि त्यांच्यात वादावादी झाली. त्यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले. बेकायदा बैलगाडी शर्यतीचे आयोजन केल्यामुळे पोलिसांनी राजेंद्र नारकर आणि हिराचंद मुरकर या दोन आयोजकांवर गुन्हा दाखल केला आहे. 

मित्रमंडळाने विनाफटका बैलगाडी शर्यतीचे केले होते. शर्यत पाहण्यासाठी सुमारे चार हजारांवर शौकिनांनी नारकरवाडी मैदानावर गर्दी केली होती. सव्वाचारच्या सुमारास शर्यतीला सुरवात झाली आणि शारिकीनांची हुल्लडबाजी सुरू झाली. शर्यतीत सुमारे सोळा ते सतरा जणांनी सहभाग घेतला होता. एकापाठोपाठ एक बैलगाड्या पळू लागल्या. शर्यत ऐन रंगात असताना पोलिसांची गाडी मैदानावर आली. आयोजकाविषयी विचारणा करण्यास सुरवात केली असताना आयोजकामधील एक-दोन पुढे आले. त्यांना काहीही न विचारता पोलिसांनी गाडीत कोंबले. हे पाहून तेथे उपस्थित विविध राजकीय पदाधिकारी आक्रमक झाले. नेमके कोणत्या कारणास्तव आयोजकांना तुम्ही नेत आहात, हे सांगा आणि त्यानंतरच घेऊन जा असे ठणकावून सांगितले. एवढ्यावरच न थांबता गाडीत कोंबलेल्या दोन्ही आयोजकांना बाहेर काढले. त्यामुळे पदाधिकारी आणि सहायक पोलिस निरीक्षक अमोल साळुंखे यांच्यात खडाजंगी झाली. श्री. साळुंखे हुल्लडबाजी करणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असे स्पष्ट केले. कोणतीही परवानगी नसल्याचे त्यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले. त्यानंतर पदाधिकारी शांत झाले. दोन आयोजकांना घेऊन पोलिस ठाण्यात आले. त्यापाठोपाठ विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारीसुद्धा आले. कणकवलीचे उपसभापती दिलीप तळेकर, जिल्हा परिषद सदस्य सुधीर नकाशे, जयेंद्र रावराणे, बाप्पी मांजरेकर, राजेंद्र राणे, बंड्या मांजरेकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते गोळा झाले. प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सहायक पोलिस निरीक्षक साळुंखे यांची भेट घेतली. 

शासन निर्णय झाला असावा, असे गृहीत धरून या शर्यतीचे आयोजन केले होते. निर्णयाची घोषणा करण्यात आली आहे; परंतु अध्यादेशाबाबत आम्ही अनभिज्ञ आहोत, अशी आयोजकांतर्फे बाप्पी मांजरेकर यांनी पोलिसांसमोर बाजू मांडली; परंतु साळुंखे यांनी आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. पोलिसांनी महालक्ष्मी मित्रमडंळाचे राजेंद्र नारकर, हिराचंद मुरकर या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. 

शौकिनांचा हिरमोड 
बैलगाडी शर्यत येथील अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे बैलगाडी शर्यत पाहण्यासाठी तीन ते चार हजार लोक मैदानावर जमा झाले. नारकरवाडीचे मैदान अक्षरशः लोकांनी फुलले होते. त्यातच सुरवातीपासून शर्यतीत चढाओढ निर्माण झाली होती. ऐन रंगात आलेली शर्यत पोलिसांनी बंद पाडल्यामुळे हजारो शौकिनांचा हिरमोड झाला. 

संभ्रम आणि अनभिज्ञता 
शासनाने बैलगाडी शर्यत सुरू करणार असल्याची घोषणा काही महिन्यांपूर्वीच केली आहे; परंतु या घोषणेचे अद्याप निर्णयात रूपांतर होऊन तो निर्णय प्रशासनापर्यत पोचलेला नाही. याची कल्पना आयोजकांना नव्हती. या अनभिज्ञतेमुळे त्यांनी या शर्यतीचे आयोजन केले होते; मात्र पोलिसांनी येऊन आयोजकांना गाडीत कोंबल्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. अशा पद्धतीने कोंबण्याचा अधिकार पोलिसांना कुणी दिला, अशी चर्चा लोकांमध्ये सुरू होती. 

Web Title: bullock cart race dispute