कुणकेश्‍वरमध्ये रापणीला बंपर मासळी

कुणकेश्‍वरमध्ये रापणीला बंपर मासळी

देवगड - तालुक्‍यातील कुणकेश्‍वर येथे रापण मासेमारीला शनिवारी (ता.8) बंपर मासळी सापडली. विविध प्रकारच्या मासळीचा यामध्ये समावेश होता. मोठ्या प्रमाणात मासळी एकाचवेळी मिळाल्याने खरेदीदारांनाही अल्प दरात मासळीचा लाभ झाला. किनाऱ्यावरील मासळीचा ढीग पहाण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.

पावसाळ्यानंतर अलिकडेच मासेमारी हंगामाला प्रारंभ झाला आहे. बंदी उठल्यानंतर हळूहळू मासेमारीला सुरूवात होत आहे. ट्रॉलर मासेमारीही सुरू झाली आहे. तरीही पावसाचा अंदाज घेत मासेमारी केली जात आहे. कुणकेश्‍वरमध्ये रापण मासेमारी चालते. गेल्या काही दिवसात रापणीला मासळी मिळण्याचे प्रमाण वाढले आहे. शनिवारी अशाच प्रकारे रापण मासेमारीला बंपर मासळी सापडली. यामध्ये बांगडा, दोडी, बारीक सुरमई, खवळी तसेच अन्य जातीचे मासे सापडले.मच्छीमार किनाऱ्यावर जाळ्यात सापडलेले मासे सोडवत बसले होते.

सध्या श्रावण सुरू असल्याने काहीजण मासे खात नाहीत. गणेशोत्सव होईपर्यंत काहीजण मांसाहार करीत नाहीत. त्यामुळे या कालावधीत मासळीची उलाढाल काहीशी मंदच असते. गणपती झाल्यानंतर खवय्यांची ओढ मासळीकडे असते. तरीही काल मिळालेली मासळी खरेदीसाठी काहींनी गर्दी केली होती. खरेदीदार कमी असल्याने आणि बंपर मासळी सापडल्याने अल्प दरातच खरेदीदारांना मासळीचा लाभ झाल्याचे चित्र होते.

स्थानिक खरेदीदारांबरोबरच देवगडमधील काहींनी कुणकेश्‍वरला धाव घेत मासळी खरेदी केल्याचे दिसत होते. कुणकेश्‍वर किनाऱ्यावर जाळ्यात सापडलेली बंपर मासळी पहाण्यासाठी तसेच त्याचे चित्र आपल्या मोबाईलमध्ये साठवण्यासाठी अनेकांची धडपड सुरू होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com