राजापूर मधील व्यापाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी

राजेंद्र बाईत | Wednesday, 19 August 2020

प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प उभारणीसाठी आता राजापूर तालुका व्यापारी संघही पुढे सरसावला आहे

राजापूर : तालुक्यातील नाणार परिसरातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प उभारणीसाठी आता राजापूर तालुका व्यापारी संघही पुढे सरसावला आहे. व्यापारी संघाने रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करताना राजापूर तालुक्यासह कोकणच्या विकासाला चालना देण्यासह रोजगार निर्मितीसाठी रिफायनरी प्रकल्पाची राजापूरात उभारणी व्हावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. प्रकल्पाचे समर्थन करण्यासह प्रकल्प मागणी करणारे निवेदन व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर यांच्या नेतृत्वाखाली संघ पदाधिकार्‍यांनी नुकतेच तहसिलदारांना दिले आहे.  

हेही वाचा - ‘अब बेबी पेंग्वीन तो गयो, इट्स शो टाईम’ ; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावरती राणेंची प्रतिक्रिया..

रत्नागिरी ग्रीन रिफायनरीला प्रकल्पाबाबतचे निवेदन नायब तहसिलदार अशोक शेळके यांच्याकडे राजापूर तालुका व्यापारी संघाच्यावतीने संघाचे अध्यक्ष मालपेकर यांनी दिले. यावेळी संघाचे सचिव व माजी नगरसेवक विलास पेडणेकर, खजिनदार व राजापूर अर्बन बँकेचे माजी संचालक दिनानाथ कोळवणकर, अर्बन बँक संचालक रज्जाक डोसानी, संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र नवाळे, विवेक गादीकर, बाळा पोकळे, कमाल मापारी आदी सदस्य, व्यापारी उपस्थित होते.

रिफायनरी प्रकल्पाबाबत गेल्या काही महिन्यांमध्ये लोकांची सकारात्मक भूमिका वाढीस लागली आहे. राजापूर तालुक्यासह संपूर्ण कोकणच्या विकासाला चालना देणारा रिफायनरी प्रकल्प व्हावा अशी मागणी प्रकल्पाला विरोध करणार्‍या शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी नुकतीच निवेदनाद्वारे केली आहे. 

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक संस्थांनी विकासासह रोजगारासाठी रिफायनरी प्रकल्प व्हावा अशी मागणी केली आहे. या सार्‍या घडामोडीमध्ये मुख्यमंत्री  ठाकरे यांनी रिफायनरीबाबत सकारात्मकता दाखविली आहे. त्यातून, आता रिफायनरी समर्थनाचा जोर वाढू लागला आहे. अशातच आता रिफायनरी व्हावी म्हणून व्यापारी संघही पुढे सरसावला आहे. तालुका व्यापारी संघाच्या नुकत्याच झालेल्या कार्यकारीणीच्या बैठकीमध्ये अटी व शर्थी ठेवून रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करणारा ठराव मंजूर करण्यात आला. 

हेही वाचा - सिंधुदुर्गात मत्स्यखवय्यांनी केली समुद्रकिनारी गर्दी ; काय कारण ? 

राजापूर शहर, तालुका आणि कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी रिफायनरीसारख्या मोठ्या प्रकल्पाची आवश्यकता आहे. त्यातच, प्रकल्पातून रोजगार निर्मिती होताना व्यापारवृद्धी होणार आहे. त्यामुळे समर्थन करीत रिफायनरी या ठिकाणी व्हावा अशी मागणी व्यापारी संघाने मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे केली आहे. याबाबतचे निवदेन व्यापारी संघाच्या पदाधिकार्‍यांनी नुकतेच तहसिलदारांना दिले.

संपादन - स्नेहल कदम