मालवणात प्लास्टिक विरोधात धडक मोहिम

मालवणात प्लास्टिक विरोधात धडक मोहिम

मालवण - प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी घातल्यानंतर आज महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या रत्नागिरी उपप्रादेशिक अधिकारी इंदिरा गायकवाड यांच्या पथकाने शहरातील बाजारपेठेत अचानक धडक मोहिम राबविली. यात दोन व्यावसायिकांकडून ४२.५० किलो नॉन ओव्हन मटेरियल (बॅग्ज) जप्त करण्यात आल्या. त्यांच्याकडून प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. अन्य काही व्यावसायिकांकडे किरकोळ प्लास्टिक पिशव्या आढळून आल्या त्या जप्त करत त्यांना सूचना देण्यात आल्या. 

दरम्यान या धडक मोहिमेस काही व्यावसायिकांनी विरोध दर्शविला. कोणत्या पिशव्या वापरायच्या याची माहितीच व्यापार्‍यांना नसल्याने याबाबतचे मार्गदर्शन करण्यासाठी बैठक घेण्यात यावी अशी मागणी व्यापार्‍यांच्यावतीने शहराध्यक्ष उमेश नेरुरकर यांनी सौ. गायकवाड यांच्याकडे केली. 

राज्यात प्लास्टिक पिशव्यांच्या वापरास पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. या पार्श्‍वभूमीवर दोन दिवसांपूर्वी पालिकेच्यावतीने शहरातील व्यापार्‍यांना याबाबतच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर आज रत्नागिरी येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक अधिकारी इंदिरा गायकवाड यांच्यासह पालिकेचे कर्मचारी गिरीश ठाकूर, जयसिंग गावित, रमेश कोकरे यांच्या पथकाने बाजारपेठेत धडक मोहिम राबविली. यात ३० ते ३५ दुकानांमध्ये जात तपासणी करण्यात आली. यापैकी विजय ट्रेडर्समध्ये २२.५० किलो नॉन ओव्हन बॅग्ज आढळून आल्या. त्यामुळे त्या जप्त करून संबंधितांकडून पाच हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. त्याचबरोबर मनीष खुपचंद वाडी कोल्हापूर यांच्याकडून २० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. त्याच्याकडूनही ५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. 

या मोहिमेस काही व्यापार्‍यांनी विरोध दर्शविला. कोणत्या पिशव्या वापरू नयेत याचे मार्गदर्शन करण्यासाठी बैठक घेण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. त्यानुसार लवकरच पालिकेत व्यापार्‍यांची बैठक घेत मार्गदर्शन केले जाईल असे मुख्याधिकारी रंजना गगे यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com