
सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - राज्याच्या नव्या मंत्रीमंडळात शिवसेनेकडून अनुभवी आमदारांना प्राधान्य मिळण्याच्या शक्यतेमुळे सिंधुदुर्गातून दीपक केसरकर यांची मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कुडाळचे आमदार वैभव नाईक हेही दावेदार आहेत. उद्या (ता. 28) होणाऱ्या शपथविधीसाठी जिल्ह्यातून शेकडो शिवसैनिक रवाना झाले.
सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - राज्याच्या नव्या मंत्रीमंडळात शिवसेनेकडून अनुभवी आमदारांना प्राधान्य मिळण्याच्या शक्यतेमुळे सिंधुदुर्गातून दीपक केसरकर यांची मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कुडाळचे आमदार वैभव नाईक हेही दावेदार आहेत. उद्या (ता. 28) होणाऱ्या शपथविधीसाठी जिल्ह्यातून शेकडो शिवसैनिक रवाना झाले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे महाशिव आघाडीच्या वतीने उद्या शिवतीर्थावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभेवर भगवा फडकवण्याचे स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे स्वप्न यावेळी सत्यात उतरणार असल्याने अवघ्या महाराष्ट्रातील शिवसेनेमध्ये नवचैतन्य पसरले आहे.
हेही वाचा - चोर आले, रे चोर आले, शेरेबाजीवर भाजपनेते म्हणाले, तुम्ही महाचोर
शिवसेनेसाठी हा एक प्रकारे सोहळाच असल्याने या शपथविधीच्या कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पदाधिकारी व कार्यकर्ते मुंबईला रवाना झाले आहेत.
महाशिवआघाडी कडून मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्यानंतर अवघ्या जिल्ह्यात शिवसैनिकांनी जल्लोष केला. उद्या (ता. 28) दादर येतील शिवतीर्थावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत. त्यामुळे शिवसेनेमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहेत.
हेही वाचा - कोकणवासियांना दिलेली आश्वासने शिवसेना पाळणार का ?
शपथविधी सोहळा पाहण्यासाठी इच्छुक मुंबईकडे
हा शपथविधी सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातून शिवसैनिक कालपासूनच मुंबईकडे रवाना व्हायला सुरूवात झाली. शपथविधिवेळी शिवसेनेकडून तीन प्रमुख मंत्री शपथ घेतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे उद्याच्या शपथविधीत सिंधुदुर्गातून कोणाला संधी मिळण्याची शक्यता कमी आहे; मात्र बहुमत सिध्द केल्यावर होणाऱ्या मंत्रीमंडळ विस्तारात सिंधुदुर्गातून केसरकर आणि नाईक यांच्यापैकी एकाला संधी मिळण्याची शक्यता आहे.
सध्या तिन्ही पक्षांना लोकाभिमूख कारभार करण्याचे आव्हान असणार आहे. यामुळे मंत्रीपदी अनुभवी आमदारांना संधी मिळण्याची शक्यता आहे. यातच स्वतः उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असल्याने शिवसेना मंत्रीपदाचा अनुभव असल्यांनाच संधी देईल असा अंदाज व्यक्त होत आहे. सिंधुदुर्गात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना शह देण्यासाठीही मंत्रीपद दिले जाईल, अशीही चर्चा आहे.
केसरकर किंवा वैभव नाईक दोघांमध्ये संधी कोणाला ?
गेल्या मंत्रीमंडळात राज्यमंत्री म्हणून महत्त्वाच्या खात्यांचे काम केल्याचा केसरकर यांना अनुभव आहे. शिवाय उध्दव ठाकरे यांच्याशीही त्यांनी चांगले जमवून घेतले आहे. यामुळे त्यांना संधी मिळण्याची जास्त शक्यता आहे. गेल्या निवडणुकीत राणेंना हरवून जायंट किलर ठरलेल्या ठरलेल्या वैभव नाईक यांना यावेळी मंत्रीपद मिळावे असा कार्यकर्त्यांसह शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांचाही आग्रह असल्याचे समजते. नाईक यांचेही मातोश्रीशी पक्के नाते आहे. शिवाय ते दुसऱ्यांना आमदार झाले आहेत. यामुळे त्यांचीही दावेदारी मानली जात आहे. या दोघांमध्ये संधी कोणाला मिळते याची उत्कंठा आहे.
सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांनी शिवसेनेला कायमच बळ दिले. त्यामुळे रत्नागिरीलाही मंत्रीपदाची संधी असल्याचे मानले जात आहे. नुकतेच शिवसेनेत परतलेले भास्कर जाधव यांचीही मंत्रीपदासाठी दावेदारी असणार आहे. त्यांना मंत्री करायचे झाल्यास कॅबिनेट दर्जा द्यावा लागणार. त्यांना मंत्रीपद देवून सिंधुदुर्गाचे पालकमंत्रीपद दिले जावू शकते अशीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे. तेथून उदय सामंत यांचाही मंत्रीपदासाठी दावा असणार आहे.