रिफायनरी रद्दच्या श्रेयासाठी शिवसेनेचा आटापिटा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 फेब्रुवारी 2019

"" राजकारण आणि सत्तेसाठी दिलेल्या पोकळ आश्‍वासनांवर कोकणी जनतेचा विश्‍वास नाही. आम्ही साधे-भोळे आहोत. मात्र, कोण खरं बोलतंय आणि कोण फसवतयं हे समजते. जोपर्यंत भूसंपादनाचा अध्यादेश रद्द केल्याचे राजपत्र प्रसिद्ध होत नाहीत तोपर्यंत रिफायनरी रद्द झाला असे म्हणता येणार नाही. '' 
- ओंकार प्रभूदेसाई,
अध्यक्ष, शेतकरी, मच्छीमार रिफायनरी विरोधी संघटना 

राजापूर - लोकसभा, विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपच्या युतीमध्ये नाणार रिफायनरी प्रकल्पाचे भवितव्य टांगणीला लागले आहे. युतीच्या घोषणेवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकांचे मत विचारात घेऊन प्रकल्प अन्यत्र हलविण्याचे स्पष्ट केले. तोच धागा पडकून शिवसेनेच्या नेत्यांकडून प्रकल्प रद्द झाल्याचा दावा करीत श्रेय घेण्याचा प्रयत्न चालवात आहे. 

राजकीय पक्षांकडून ज्यांच्यासाठी हा आटापिटा सुरू आहे त्या नाणारवासीयांकडून भूसंपादनाची अधिसूचना रद्द करा तेव्हाच विश्‍वास ठेवू अशी सावध प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. या साऱ्या घडामोडींमध्ये खरोखरच "नाणार राहणार, रिफायनरी जाणार' असे घडणार का ? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. 

युतीची घोषणा करण्यात आली त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाणार रद्द होणार असल्याचे सांगितले. फडणवीस यांनी लोकांचे मत विचारात घेऊन अन्यत्र हलविणार असल्याचे सांगितले. यापूर्वी प्रकल्पाबाबतच्या अशा घोषणा झाल्या होत्या. त्यामघ्ये उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी भूसंपादन अधिसूचना रद्द झाल्याच्या केलेल्या घोषणेचा समावेश आहे. मात्र, प्रत्यक्षात भूसंपादन अधिसूचना रद्द झालेली नाही. त्यामुळे यावेळी प्रकल्पग्रस्त सावध आहेत. 

"" राजकारण आणि सत्तेसाठी दिलेल्या पोकळ आश्‍वासनांवर कोकणी जनतेचा विश्‍वास नाही. आम्ही साधे-भोळे आहोत. मात्र, कोण खरं बोलतंय आणि कोण फसवतयं हे समजते. जोपर्यंत भूसंपादनाचा अध्यादेश रद्द केल्याचे राजपत्र प्रसिद्ध होत नाहीत तोपर्यंत रिफायनरी रद्द झाला असे म्हणता येणार नाही. '' 
- ओंकार प्रभूदेसाई,
अध्यक्ष, शेतकरी, मच्छीमार रिफायनरी विरोधी संघटना 

"" शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या घोषणेप्रमाणे नाणार येथील रिफायनरी प्रकल्प रद्द होऊन तो अन्यत्र हलविला जाणार हे निश्‍चित आहे. शिवसेनेने यापूर्वी केलेल्या घोषणेप्रमाणे करून दाखविले आहे.'' 
- प्रकाश कुवळेकर,
शिवसेना तालुकाप्रमुख, शिवसेना 
 

Web Title: cancellation of Nanar Refinery issue