केरळातील पावसामुळे रेल्वे रद्द, प्रवाशांची गैरसोय 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

कणकवली - कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या मंगला एक्‍स्प्रेस, ओखा एक्‍स्प्रेस, गरीबरथ या गाड्या रद्द करण्यात आल्या. या एक्‍स्प्रेस रद्द झाल्याची घोषणा ऐनवेळी केल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.

कणकवली - कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या मंगला एक्‍स्प्रेस, ओखा एक्‍स्प्रेस, गरीबरथ या गाड्या रद्द करण्यात आल्या. या एक्‍स्प्रेस रद्द झाल्याची घोषणा ऐनवेळी केल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. रेल्वे प्रशासनाच्या कारभाराविरोधात संतापही व्यक्‍त झाला. मागाहून येणाऱ्या दिवा, मांडवी एक्‍सप्रेसमधून रद्द झालेल्या गाड्यातील प्रवासी पुढे रवाना झाले. 

केरळमध्ये अतिवृष्टी झाल्याने अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या. त्यानुसार आज मुंबईच्या दिशेने जाणारी मंगला एक्‍स्प्रेस, ओखा एक्‍स्प्रेस, गरीब रथ आदी गाड्या नियोजित वेळेत दाखल झाल्या नाहीत. तर ऐनवेळी या गाड्या रद्द झाल्याची उद्‌घोषणा स्थानकातून करण्यात आली. त्यामुळे प्रवासीवर्गातून तीव्र नाराजी व्यक्‍त करण्यात आली. काही प्रवाशांनी रेल्वे स्टेशनमास्तरांनाही याबाबतचा जाब विचारला; मात्र केरळमध्ये अतिवृष्टी होत असल्याने लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द झाल्याची माहिती देण्यात आली. 

कणकवली स्थानकात थांबणाऱ्या मंगला, ओखा एक्‍स्प्रेस रद्द झाल्यानंतर या गाडीतील प्रवाशांनी मांडवी एक्‍सप्रेसमधून मुंबईकडे प्रस्थान केले. आज दुपारी साडे तीन वाजता रेल्वे प्रशासनाकडून काही फेऱ्या रद्द झाल्याची माहिती देण्यात आली. पुढील दोन दिवस केरळमध्ये जाणाऱ्या आणि तेथून सुटणाऱ्या अनेक गाड्या रद्द तसेच दुसऱ्या मार्गाने वळविल्याचेही सांगण्यात येत होते. 

आज रद्द झालेल्या गाड्या 
गाडी क्र.16346 नेत्रावती एक्‍स्प्रेस 
गाडी क्र.16511 बेंगलुरू-कन्नूर 

मार्ग बदललेल्या गाड्या 
गाडी क्र.12431 राजधानी एक्‍स्प्रेस 
गाडी क्र.22475 बिकानेर-कोईमतूर चार तास विलंबाने 

Web Title: Cancellation of rail due to rain in Kerala