वाहकांना शिवशाहीची धास्ती

वाहकांना शिवशाहीची धास्ती

सावंतवाडी - नोव्हेंबरमध्ये शिवशाहीच्या पदार्पणास १ वर्ष पूर्ण होणार आहे. मात्र, ११ महिन्यांत शिवशाहीस तब्बल ९ वेळा अपघातास सामोरे जावे लागले. ९ मधील ७ अपघात घाटमाथा परिसरात झाल्यामुळे या गाडीवर कार्यरत खासगी चालकांच्या कार्यपद्धतीबाबत जिल्ह्यातील एसटी महामंडळाच्या वाहकांनी धास्ती घेतली आहे. किणी अपघातानंतर आज सकाळी सव्वा सातला सुटणाऱ्या शिवशाहीवर वाहकाने जायला नकार दिल्याने ही गाडी तब्बल चार तास उशिरा सोडण्याची नामुष्की एसटी प्रशासनावर आली.

एसटी महामंडळाचे खासगीकरण होते की काय, असा प्रश्‍न गेली कित्येक वर्षे चर्चेला जात होता; मात्र खासगी वाहतुकीमुळे दुरावलेला प्रवासी पुन्हा एसटीकडे वळविण्यासाठी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या संकल्पनेतून शिवशाहीची संकल्पना नोव्हेंबर २०१७ मध्ये अमलात आणली. राज्यभरात सुसज्ज वातानुकूलीत बस डेपोत दाखल झाल्या. मात्र, सिंधुदुर्गात या बस सततच्या अपघातामुळे धास्ती निर्माण करणाऱ्या ठरल्या आहेत.

जिल्ह्यातील शिवशाहींच्या अपघाताची मालिका मार्च २०१८ नंतर सुरू झाली. याचा परिणाम प्रवासी भारमानावरही जाणवत आहे. आज येथील आगारात पुणे निगडी या परतीच्या प्रवासात कोल्हापूर येथे किणी टोल नाक्‍याजवळ शिवशाहीला झालेल्या अपघातानंतर या गाड्यांबाबतची धास्ती अधिक ठळक झाली. यात एका वाहकाचा जीव गेला. त्यामुळे शिवशाहीत बसमध्ये प्रवास करण्याचा धसका वाहाकांनी घेतला आहे. आज येथील डेपोतून सुटणाऱ्या सव्वा सात व आठच्या पुणे येथील दोन शिवशाही तब्बल सव्वा ११ वाजता पुणेच्या दिशेने रवाना झाल्या.

वाहक या गाडीची जबाबदारी घ्यायला तयार नसल्याने हा उशिर झाल्याचे समजते. याचे कारण जाणून घ्यायचा प्रयत्न केला असता पुढे आलेले वास्तव वेगळेच आहे. शिवशाहीत वाहक एसटी महामंडळाचा तर चालक खासगी अशी रचना असते. याची जबाबदारी संबंधित खासगी गाडी मालकाची असते; मात्र ते अपघात दक्षतेबाबत फारसे गंभीर नसतात. चालकाला क्षमतेपेक्षा जास्त वेळ गाडी चालवायला लावली जात असल्याचीही चर्चा आहे.

अशा वेळी नवनियुक्त वाहकांवर याची जबाबदारी टाकली जाते. किणी अपघातानंतर वाहकांनी या गाडीचा धस्का घेतला आहे. याबाबत एसटी महामंडळाची बाजू जाणून घेण्यासाठी येथील आगार प्रमुख शकील सय्यद यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अपघाताची माहिती दिली; मात्र शिवशाहीच्या सुरक्षेबाबत व आज गाड्यांना झालेल्या विलंबाबत बोलणे टाळले.

अशा आहेत शिवशाही
डेपोचे नाव    संख्या
 वेंगुर्ले    २
 कुडाळ    २
 सावंतवाडी    ४
 मालवण    ३
 एकूण    ११

येथील डेपोतून पणजी पुणे ही एसटी २० वर्षांपासून विनाअपघात कार्यरत आहे; मात्र वर्ष व्हायच्या आत शिवशाहीला इतके अपघात का झाले, याचा विचार केला जावा. शिवशाहीच्या खासगी चालकांना चांगले प्रशिक्षण द्यावे. अथवा एसटीच्या चालकांना तरी शिवशाही चालविण्यास द्यावी.
- अरुण गवस, 

डेपो सचिव, एसटी कामगार संघटना डेपो 

असे झाले अपघात
तारीख    ठिकाण
१२-३-१८    आंबोली धबधबा 
५-६-१८    गगनबावडा घाटाजवळ
६-६ -१८    कोल्हापूर पुणे मार्ग सिंत्रे फाटा
१८-६-१८    करुळ  गगनबावडा, दिंडवणे गावात
२६-८-१८    आंबोली घाट, कुंभेश्‍वर
२२-८-१८    करुळ घाट महादेव मंदिर
२९-९-१८    फोंडा घाट सुरुवातीस
५-१०-१८    किणी टोलनाका कोल्हापूर, बेंगलोर 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com