सिंधुदुर्गात कॅशचा तुटवडा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 मे 2017

एटीएममध्ये ठणठणाट - गुरुवारपर्यंत स्थिती सुधारण्याची शक्‍यता

सावंतवाडी - कॅशचा तुटवडा असल्यामुळे एटीएम केंद्रात गुरुवार (ता. १८) पर्यंत तुटवडा राहण्याची शक्‍यता आहे. येणारी रक्कम परत देऊन स्थानिक स्तरावर ॲडजेस्टमेंट करण्यात आली आहे; मात्र त्यासाठी दहा हजाराची मर्यादा ठेवण्यात आली आहे. 

एटीएममध्ये ठणठणाट - गुरुवारपर्यंत स्थिती सुधारण्याची शक्‍यता

सावंतवाडी - कॅशचा तुटवडा असल्यामुळे एटीएम केंद्रात गुरुवार (ता. १८) पर्यंत तुटवडा राहण्याची शक्‍यता आहे. येणारी रक्कम परत देऊन स्थानिक स्तरावर ॲडजेस्टमेंट करण्यात आली आहे; मात्र त्यासाठी दहा हजाराची मर्यादा ठेवण्यात आली आहे. 

याबाबत येथील स्टेट बॅक ऑफ इंडियाच्या प्रशासनाने दुजोरा दिला आहे. बॅंकांकडे दोन हजाराच्या पुरेशा नोटाच नसल्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला आहे. अद्याप आपल्याला आरबीआयच्या वरिष्ठ प्रशासनाकडून कोणतेही निर्देश देण्यात आले नाहीत, असे येथील बॅंकेचे सरव्यवस्थापक नंदकुमार भोसले यांनी सांगितले.

जिल्ह्यात (ता. १३) पासून कॅशचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे एटीएम केंद्रे बंद अवस्थेत ठेवण्याची पाळी सर्वच बॅंकांच्या व्यवस्थापनावर आली आहे. दरम्यान याबाबत आवश्‍यक माहिती घेण्यासाठी येथील स्टेट बॅंकेचे सरव्यवस्थापक श्री. नंदकुमार भोसले यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘‘जिल्ह्यातच कॅशचा तुटवडा निर्माण झाला आहे. गेल्या आठवड्यात आपण तब्बल सव्वाशे कोटी रुपये सर्व बॅंकांना दिले होते. यात सर्व दोन हजार रुपयाच्या नोटा होत्या. सद्य:स्थिती लक्षात घेता ह्या नोटा बाजारात खेळणे गरजेचे आहे; परंतु मोठ्या प्रमाणात कॅशचा तुटवडा भासत आहे. अनेक लोकांनी आपले पैसे घरात साठवून ठेवले असल्यामुळे ही समस्या निर्माण झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. यावर मात करण्याचा प्रयत्न सुरू आहे; मात्र आंबे काजूचा हंगाम असल्यामुळे बाजारात पैसे फिरणे महत्वाचे आहे; मात्र तशा पध्दतीने कॅश बॅंकेत पुन्हा जमा होताना दिसत नाही. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती येत्या (ता.१८) पर्यत राहण्याची शक्‍यता आहे. आरबीआयच्या वरिष्ठ कार्यालयाने दिलेल्या निर्देशानुसार गुरूवार नंतरच ही समस्या दुर होइल तो पर्यत रोजच्या व्यवहारात आलेले पैसे एटीएम तसेच बॅंकेतून पुन्हा लोकांना देण्याचे काम सुरू आहे; मात्र त्यासाठी दहा हजार रुपयाची मर्यादा ठेवण्यात आली आहे. अपघात, आपत्कालीन परिस्थिती अशा परिस्थिती चाळीस हजार रुपयापर्यत पैसे उपलब्ध करुन देण्यात येणार आहे; मात्र त्यासाठी कारण योग्य असणे गरजेचे आहे.’’
 

सद्य:स्थिती लक्षात घेता स्टेट बॅंकेतच कॅश नाही. त्यामुळे आमच्यावर अवलंबून असलेल्या अन्य बॅंकांनी आपली गरज आपणच भागवावी त्यासाठी आरबीआयने त्यांच्या शाखेसाठी परवानगी देताना त्यांचीच एक मोठी शाखा लिंक केलेली असेल त्यांच्याकडून त्यांनी आवश्‍यक ती कॅश घ्यावी.
- नंदकुमार भोसले, सरव्यवस्थापक स्टेट बॅंक

नाहक साठवणूक करणे अडचणीचे 
या वेळी श्री. भोसले म्हणाले, ‘‘लग्न तसेच घरात असणारे कार्यक्रम तसेच कोणाचे पैसे देय असल्यानंतर अनेकांकडून तीन ते पाच लाख रुपये एकाच वेळी साठवणूक करून ठेवण्यात येतात. त्यामुळे हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. अशा प्रकारे नाहक साठवणूक करण्यापेक्षा लोकांनी रोजचे व्यवहार रोज करावे किंवा कॅशलेसचा पर्याय स्विकारुन अन्य लोकांना मदत करावी.

एटीएमसमोर लागल्या रांगा
सावंतवाडी ः नोटाबंदीनंतर पुन्हा एकदा सर्वसामान्य नागरिकांना एटीएमच्या बाहेर रांगा लावण्याची वेळ आली आहे. येथील शहरात आज काही मोजक्‍या एटीएममध्ये पैसे होते. त्याच्यासमोर समोर सकाळपासून रांगा होत्या.

डिसेंबर महिन्यात केंद्र शासनाने हजार व पाचशेच्या नोटा चलनातून बाद करून नव्या नोटा चलनात आणल्या होत्या; परंतु नवीन नोटा चलनात येईपर्यंत सर्वसामांन्याना मोठा त्रास सहन करावा लागला. दोन हजारच्या नोटामुळे मोठे व्यवहार करणे शक्‍य झाले असले तरी किरकोळ व छोटे व्यवहार करताना मोठ्या अडचणीचा सामना नागरिकांना करावा लागला. याची पुनरावृत्ती कालपासून होताना दिसून आली आहे. काल (ता. १४) शहरातील सर्वच एटीएम मशीनमध्ये चलन तुटवडा असल्याचे चित्र होते. त्यातील अनेक एटीएम मशीन बंद अवस्थेत होती. पैशासाठी प्रत्येक एटीएम मशीनकडे चकरा मारण्याची वेळ आली.   आज सकाळपासून शहरातील काही एटीएम मशीनसमोर नागरिकांची गर्दी होती. नोटाबंदीच्या काळातील आठवण पुन्हा एकदा सर्वांना झाली. चलन तुटवडा निर्माण झाल्यामुळे या त्रासाला सामोरे जावे लागले.

Web Title: cash shortage in sindhudurg