आरटीओ एजंटने काजू कारखानदाराची केली अशी फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 9 August 2020

7 ऑगस्टला 11.30 वाजेपर्यंत परवाना पत्र आणून न दिल्याने याबाबतची खात्री करण्यासाठी आरटीओ कार्यालयात गेले असता अद्यापपर्यंत नोंदणी न झाल्याचे निदर्शनास आले.  

वेंगुर्ले ( सिंधुदुर्ग ) - एका आरटीओ एजंटकडून बनावट दस्तऐवज करीत चुकीच्या पद्धतीने मोटारीची नोंदणी करुन मठ येथील काजू कारखानदार रोहन बोवलेकर यांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत संबंधित एजंटच्या विरोधात बोवलेकर यांनी फसवणूक केल्याची तक्रार ओरोस पोलिसांत दिली आहे. 

त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, पर्वरी - गोवा याठिकाणी शोरूममधून 6 जानेवारी 2018 ला मोटार खरेदी केली होती. याची नोंदणी करण्यासाठी आरटीओ कार्यालयात संबंधित एजंटाकडे वडिलांच्या नावे कागदपत्रे दिली होती. 18 जानेवारी 2018 ला खास नोंदणी नंबर मिळण्यासाठी एजंटाने 7 हजार 500 रुपये घेतले. या गाडीची उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सिंधुदुर्ग यांच्याकडून पहाणी करत गाडीचा चेस नंबर व इंजिन नंबर घेण्यात आला. महिन्यानंतर संबंधित एजंटाने नोंदणी झालेले परवाना पत्र आणून दिले. आणून दिलेल्या दस्तऐवजांवरुन गाडीचा इन्शुरन्स रिन्युव्ह करण्याकरीता मारुती इन्श्‍युरन्स ब्रोकिग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या गोवा कार्यालयाकडे संपर्क केला. त्यांनी आमच्या मोटारीचा नंबर टाईप केला असता ती गाडी माझ्या वडिलांच्या नावे नसल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत संबंधित एजंटाकडे चौकशी केली असता त्याने तुमच्या गाडीचा नंबर चुकून दुसऱ्या गाडीला दिलेला असल्याने मी तुम्हाला एमएच-07-एजी 6999 हा नविन नंबर रजिस्टर करुन देतो, असे सांगितले; परंतु 7 ऑगस्टला 11.30 वाजेपर्यंत परवाना पत्र आणून न दिल्याने याबाबतची खात्री करण्यासाठी आरटीओ कार्यालयात गेले असता अद्यापपर्यंत नोंदणी न झाल्याचे निदर्शनास आले.  

 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cashew Manufacturer File Case Against RTO Agent