सिंधुदुर्गात अकराशे कोटींचा काजू पडून : संजय नाईक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 एप्रिल 2020

मात्र ट्रान्झिस्ट पास मिळत नसल्याने काजू बी शेतकऱ्यांकडून कारखानदारांपर्यंत पोहोचत नाही. त्यावेळी ओली बी खराब होण्याची शक्‍यता आहे.

कुडाळ (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यातील काजू बागायतदारांवर कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर असलेल्या लॉकडाउनचा गंभीर परिणाम झाला आहे. यामध्ये जवळपास पूर्ण कोकणात एक लाख टन म्हणजेच अकराशे कोटींचा काजू पडून आहे, अशी माहिती तेंडोली येथील प्रसिद्ध बागायतदार संजय नाईक यांनी दिली. माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे बागायतदारांच्या व्यथा मांडाव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे. 

श्री. नाईक म्हणाले, ""काजू बागायतदारांच्या व्यथा श्री. प्रभू यांच्या माध्यमातून पंतप्रधानांना समजाव्यात म्हणून दिल्ली येथून पीटीआय संस्थेकडून माहिती घेण्यात आली. यासाठी पत्रकार राजन नाईक यांचेसुद्धा सहकार्य लाभले. काजू बी पुढील प्रक्रियेसाठी सुकणे फार आवश्‍यक आहे; मात्र ट्रान्झिस्ट पास मिळत नसल्याने काजू बी शेतकऱ्यांकडून कारखानदारांपर्यंत पोहोचत नाही. त्यावेळी ओली बी खराब होण्याची शक्‍यता आहे.

कोकणातील शेतकऱ्यांचा अन्न, वस्त्र, निवारा काजूवरच अवलंबून आहे. कोकणातील शेतकऱ्यांवर यामुळे उपासमारीची वेळ येण्याचे संकट उद्‌भवले आहे. गोवा येथे वायनरीसाठी जाणारा बोंडू केवळ वाहतुकीअभावी जिल्ह्यातच पडून सडून गेल्याने बागायतदार शेतकरी यांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे. लहान-लहान गरीब बागायतदारांचे तसेच हातावर पोट असणाऱ्यांचे अपरिमित नुकसान झाले आहे. हे लक्षात आणून देणे काळाची गरज आहे. कोरोनातून भारत सहीसलामत सुटावा. पंतप्रधानांच्या प्रयत्नांना यश येऊ दे.'' 

तत्काळ मार्ग काढा 
कोकणातील काजू बागायतदारांना या भीषण आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रभू यांनी मार्ग काढावा, अशी मागणी जिल्ह्यातील बागायतदारांनी केली आहे. कोकणातील प्रसार माध्यम प्रतिनिधींनीही हे प्रश्न दिल्ली दरबारी कळावेत, यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत, असेही श्री. नाईक यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cashew nut problem konkan sindhudurg