दोडामार्गात काजू उत्‍पादकांची लूट

दोडामार्गात काजू उत्‍पादकांची लूट

दोडामार्ग - काजू खरेदीसाठी बॅंकांकडून रक्कम मिळेनाशी झाल्याने अनेकदा व्यापारी व कारखानदारांनी रविवारच्या आठवडा बाजारात दुपारी १२ वाजताच काजू खरेदी बंद केली आणि शेतकऱ्यांचे हाल झाले. या संधीचा फायदा ज्यांच्याकडे पैसे होते त्यांनी घेत चक्क १४० रुपयांचा काजू १२० ते ११० रुपये प्रतिकिलोने खरेदी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटाबंदीने काही व्यापाऱ्यांची चंगळ झाली, तर शेतकऱ्यांची लूट झाली. त्यामुळे पुन्हा एकदा काजू बीला हमी भाव मिळण्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

काजूचा पहिला दर १७० रुपये प्रतिकिलो होता. दोन आठवडे तो स्थिर राहिला. रविवारी मात्र तो १४०-१४५ वर आला. सध्या काजूचा हंगाम ऐन भरात असल्याने आठवडा बाजारात मोठ्या प्रमाणावर काजूची आवक झाली. १७० चा दर १४० वर आल्याने या आठवड्यात तब्बल तीस रुपये प्रतिकिलो नुकसान शेतकऱ्यांना सोसावे लागले. यातच भर दुपारी अनेक व्यापाऱ्यांनी आपल्याकडचे पैसे संपल्याने काजू बी खरेदी करू शकत नसल्याचे जाहीर केले. त्यामुळे शेतकऱ्यांनी दुसऱ्या व्यापाऱ्यांकडे धाव घेतली. अनेक ठिकाणी काजू विक्रीसाठी शेतकऱ्यांनी रांगाही लावल्या; पण पैसे नसल्याने त्यांना व्यापाऱ्यांनी परत पाठविले. काजू विकून आवश्‍यक घरगुती सामान खरेदी करणार म्हणून ग्रामीण भागातून आलेल्या शेतकऱ्यांसमोर पेचप्रसंग उभा राहिला. काजू परत न्यायचे तर पुन्हा हमाली, शिवाय घरी काहीच न घेता परतावे लागणार असा विचार आल्याने अनेक शेतकरी हतबल झाले. त्यांच्या हतबलतेचा फायदा मग काहीजणांनी उचलला. तत्काळ जिल्ह्याभरातील काजूचा दर खाली आला. बांदा, सावंतवाडी, कुडाळ, दोडामार्ग असा सगळीकडे दर पडला. कुठे ११०, कुठे १२०, कुठे १३० असा दर लावला गेला. व्यापाऱ्यांनी अशा उद्‌भवलेल्या पैशांच्या कमतरतेच्या समस्येच्या संधीचा उपयोग करून घेतला आणि चक्क १४० ते १४५ चा दर ११० ते १३० वर आणला गेला. नोटाबंदीमुळे पैशाचा तुटवडा भासल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. काजू आवक वाढल्याने दर घसरल्याचेही काही व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. असे असले तरी योग्य हमी भाव देत नसल्याने काजू उत्पादन करणारा शेतकरी कसा नागवला जातो, याचे हे उदाहरणच म्हणावे लागेल.

आता तरी डोळे उघडा
एकीकडे राजकीय पुढाऱ्यांच्या मुलांच्या लग्नावर करोडो रुपये उधळले जाताहेत. राजकारण्यांना लग्न समारंभासाठी निवडणुकीतील अर्थपूर्ण व्यवहारासाठी लाखो रुपये सहज मिळताहेत, तर दुसरीकडे व्यापारी व सर्वसामान्य जनतेला नियमानुसार बोट ठेवून बॅंकवाले हैराण करताहेत. सर्वसामान्य शेतकऱ्याला आपल्या मुलासाठी, शिक्षण व औषधोपचारासाठी आणि उदरनिर्वाहासाठी पैसा मिळत नाही. त्यांना सगळेजण सगळीकडून नाडताहेत अशी स्थिती आहे. शासनाने बंद डोळे आता तरी उघडावेत, अशी अपेक्षा शेतकरी करत आहेत.

त्यांनीही सोडले वाऱ्यावर
शेतकऱ्यांच्या भल्यासाठी म्हणून तालुक्‍यात अनेक कृषी संस्था स्थापन झाल्या. अनेकांनी काजू खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांशी आपल्या काजूला हमी भाव देण्याबाबत करार केला; पण सामान्य शेतकरी जो वर्षभर कष्ट करतो आणि काजू विकून मिळणाऱ्या रकमेवर कुटुंबाची गुजराण करतो, मुलाबाळांचे शिक्षण, आरोग्य, कपड्यांचे प्रश्‍न हाताळतो, तो मात्र आज देशोधडीला लागला. त्यांच्या पाठीशी ना कुणी राजकारणी राहिला, ना कुठली संस्था. शेतकरी लुबाडला, नाडला जात असल्याने शासनानेच काजू बीला योग्य हमी भाव देण्याची वेळ आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com